Vadodara Crocodile Viral Video : गुजरातमध्ये सध्या पुराणे थैमान घातले आहे. वडोदरा शहरात पुराचे पाणी शिरले आहे. या पाण्याबरोबर अनेक मगरी देखील शहरात घुसल्या आहेत. या मगरीचे व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात दोघे तरुण एका मगरीला चक्क दुचाकीवरून घेऊन जातांना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. हे दोघे तरुण या मगरीला रेस्क्यू सेंटरमध्ये घेऊन जात असल्याची माहिती पुढे आली आहे.
गुजरातच्या वडोदरा शहरातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन तरुण मगरीला स्कूटीवरून कुठेतरी घेऊन जात आहेत. २७ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट दरम्यान वडोदरा येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे विश्वामित्री नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानंतर २४ मगरी पुराच्या पाण्यात वाहून शहरात आल्या. या मगरी वडोदरा शहरात विविध परिसरात दाखल झाल्या आहेत. या मगरींचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.
या मगरींना पकडून त्यांना रेस्क्यू सेंटरमध्ये घेऊन जात असतांनाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. रेस्क्यू सेंटरचे कर्मचारी एका मगरीला पकडून दुचाकीवरून घेऊन जात होते. त्यांच्या गाड्या इतर रेस्क्यू ऑपरेशनमध्ये गुंतल्या असल्याने या दोघांना या मगरीला दुचाकीवरून घेऊन जाण्याची वेळ आली आहे. एका व्यक्तीने याचा व्हिडिओ मोबाइलमध्ये कैद केला असून तो सोशल मिडियावर अपलोड केला आहे. काही वेळातच हा व्हिडिओ तूफान व्हायरल झाला असून नेटकरी यावर भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. दोन तरुण मगरीला ॲक्टिव्हावरून घेऊन जात होते. हा व्हिडिओ सध्या खूप ट्रेंड करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही तरुण मगरीची सुटका करून वनविभागाच्या ताब्यात देणार होते.
वडोदरा रेंज फॉरेस्ट ऑफिसर करण सिंह राजपूत यांच्या म्हणण्यानुसार, विश्वामित्री नदीत सुमारे ४४० मगरी आहेत. त्यापैकी काही मगरी या पुराच्या पाण्यात वाहून शहरात आल्या. धरणातून पाणी सोडल्यामुळे आलेल्या पुराच्या वेळी निवासी भागात या मगरी गेल्या. गेल्या तीन दिवसांत २४ मगरी पकडण्यात आल्या आहेत. तसेच ७५ इतर प्राण्यांची सुटका देखील करण्यात आली आहे. यामध्ये साप, कोब्रा, सुमारे ४० किलो वजनाचे पाच मोठे कासव आणि एक पोर्क्युपिन यांचा समावेश आहे. त्यांनी सांगितले की आम्ही सोडवलेली सर्वात छोटी मगर दोन फूट लांब होती. तर सर्वात मोठ्या मगरीची लांबी १४ फूट आहे.