Gujrat Crime News: गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील एका व्यक्तीने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याची पत्नी आणि दोन मुलांनी मुस्लिम धर्म स्वीकारला होता. त्यामुळे त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. धर्मांतर केल्यानंतर पत्नी आणि मुले वेगळी राहत होती, त्यामुळे पती नैराश्यात होता. पोलिसांनी हरेश सोलंकीची पत्नी आणि त्यांच्या मुलांना मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी ब्रेनवॉश करून आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकऱणी दोन आरोपींना सोमवारी अटक करण्यात आली. बनासकांठाच्या दीसा तालुक्यातील मलगढ गावी राहणाऱ्या सोलंकी यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पालनपूर शहरातील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं म्हटलं जात आहे. रविवारी सायंकाळी पालनपूर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. सोलंकी यांच्याजवळ एक चिठ्ठी आढळून आली आहे. त्यामध्ये शेख कुटुंबियांना त्याच्या मानसिक अवस्थेसाठी जबाबदार असल्याचं म्हटलंय. यामुळेच आत्महत्येचं पाऊल उचलावं लागल्याचं चिठ्ठीत म्हटलं आहे.
सोलंकी यांचा भाऊ राजेशने पोलिसात तक्रार दाखल केली होती. यात आरोप केला होता की, आरोपींनी सोळंकी कुटुंबाच्या सदस्यांना मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी ब्रेन वॉश केला. सोलंकी यांची मुलगी सुरुवातीला कॉलेजमध्ये एजाज शेख याच्या संपर्कात होती. जेव्हा कुटुंबाने त्यांच्या मैत्रीला विरोध केला तेव्हा ती त्याच्यासोबत राहण्याचा हट्ट करायला लागली. त्यानंतर आई आणि भावानेसुद्धा मुलीची बाजू घेतली. त्यानंतर तिघेही घरी नमाज पठण करायला लागले. जेव्हा त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी याचा विरोध केला तेव्हा सोलंकी यांची पत्नी, मुलगी आणि मुलगा घर सोडून शेख कुटुंबियांच्या मदतीने वेगळे राहू लागले. त्यानंतर त्यांची माहिती मिळू शकली नाही.
पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत असं म्हटलं आहे की, जेव्हा सोलंकी यांनी शेख कुटुंबियांशी बोलून पत्नी, मुलगा आणि मुलीची माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा २५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली. तक्रारीच्या आधारे शेख कुटुंबातील ५ जणांविरोधात भादंवि कलम ३०६, ३८४ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या