Gujarat State will Ban Phone for Children : मोबाइल व सोशल मिडियामुळे लहान मुलांच्या मनावर गंभीर परिणाम होत आहे. यामुळे मुलांना फोन व सोशल मीडिया बंद करावा अशी मागणी होत होती. दरम्यान, गुजरात सरकार आता लहान मुलांसाठी मोबाइल व सोशल मीडियावर निर्बंध घालण्याच्या तयारीत आहे. लहान मुलांकडून मोबाइल फोन आणि सोशल मीडियाचा वापर रोखण्यासाठी गुजरात सरकार मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार आहे.
गुजरात सरकारने गुरुवारी सांगितले की, लहान मुलांकडून मोबाइल फोन आणि सोशल मीडियाच्या वापरावर निर्बंध घालण्यासाठी लवकरच मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील. मोबईलवर जास्त वेळ घालवणं मुलांसाठी चांगलं नाही, असं सरकारचं मत आहे.
मुलांना मोबाइलपासून दूर ठेवणे आणि त्यांना मैदानी खेळ, अभ्यासाकडे आकर्षित करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला जाणार असल्याचे गुजरातचे शिक्षणमंत्री प्रफुल्ल पानसेरिया यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तज्ज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील, असे त्यांनी सांगितले.
गुजरातचे शिक्षणमंत्री प्रफुल्ल पानसेरिया म्हणाले की, आम्ही प्राथमिक शाळांमधील मुलांसाठी मोबाईलवर बंदी घालण्याचा शासन निर्णय यापूर्वी जारी केला होता. यापुढे त्याचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे.
शिक्षणमंत्री प्रफुल्ल पानसेरिया म्हणाले की, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना या नव्या मार्गदर्शक तत्त्वांबद्दल जागरूक करण्यात येणार आहे. मोबाइल बंदीसाठी पालकांच्या जागृतीसाठी व्यापक प्रचार करण्याला प्रोत्साहन दिलं जाणार आहे. ऑस्ट्रेलियाने नुकतीच १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घातली आहे.
इतकंच नाही तर केंद्र सरकारही या दिशेने काम करत आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, केंद्र सरकार १८ वर्षांखालील मुलांसाठी मोबाइल फोनवर पूर्णपणे बंदी घालण्याऐवजी इंटरनेट वापरावर पालकांच्या देखरेखीखाली नियंत्रण आणण्याचा विचार करत आहे.
संबंधित बातम्या