Game Zone Fire : राजकोटमध्ये गेमिंग झोनमध्ये अग्नितांडव, ९ मुलांसह २४ जणांचा होरपळून मृत्यू
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Game Zone Fire : राजकोटमध्ये गेमिंग झोनमध्ये अग्नितांडव, ९ मुलांसह २४ जणांचा होरपळून मृत्यू

Game Zone Fire : राजकोटमध्ये गेमिंग झोनमध्ये अग्नितांडव, ९ मुलांसह २४ जणांचा होरपळून मृत्यू

May 25, 2024 10:37 PM IST

Gujarat Fire : राजकोटमधील टीआरपी (TRP) गेम झोनमध्ये भीषण आग लागल्लयाने २४ लोकांचा मृत्यू झाला असून यामध्ये ९ मुलांचा समावेश आहे. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

राजकोटमधील गेमिंग झोनला आग
राजकोटमधील गेमिंग झोनला आग (PTI)

गुजरातमधील राजकोटमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील एका गेमिंग झोनमध्ये शनिवारी संध्याकाळी लागलेल्या भीषण आगीत २४ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. राजकोटमधील टीआरपी (TRP) गेम झोनमध्ये भीषण आग लागल्लयाने २४ लोकांचा मृत्यू झाला असून यामध्ये ९ मुलांचा समावेश आहे. दरम्यान गुजरातचे गृह राज्य मंत्री हर्ष संघवी यांनी २४ जणांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. राजकोट शहराचे पोलिस आयुक्त राजू भार्गव यांनी सांगितले की, घटनेनंतर टीआरपी गेम झोनचे मालक आणि व्यवस्थापकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

दरम्यान या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी एक्सवर लिहिले की, "राजकोटमधील आगीच्या दुर्घटनेने मी अत्यंत व्यथित झालो आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्यासमवेत माझ्या संवेदना आहेत. जखमींसाठी प्रार्थना. स्थानिक प्रशासन बाधितांना सर्वतोपरी मदत करण्याचे काम करत आहे.

मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल म्हणाले की, मृतांच्या कुटुंबियांना ४ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत सरकारकडून दिली जाईल.

भूपेंद्र पटेल यांनी आगीच्या घटनेत तातडीने बचाव व मदत कार्य करण्याच्या सूचना महापालिका आणि प्रशासनाला दिल्या आहेत. जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या व्यवस्थेला प्राधान्य देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत,' अशी माहिती भूपेंद्र पटेल यांनी दिली.

भाजप आमदार दर्शिता शहा म्हणाल्या, राजकोटमध्ये आज एक अत्यंत दु:खद घटना घडली आहे. राजकोटच्या इतिहासात पहिल्यांदाच गेम झोनमध्ये लागलेल्या आगीत लहान मुलांना जीव गमवावा लागला आहे... सरकार या प्रकरणी कारवाई करेल पण सध्या जास्तीत जास्त लोकांना वाचवण्याला प्राधान्य आहे'

 

डोंबिवली केमिकल स्फोटातील मृतांचा आकडा वाढला - 

डोंबिवलीतील औद्योगिक वसाहतीला गुरुवारी लागलेल्या आगीत ११ जणांचा मृत्यू झाला, तर ६० हून अधिक जण जखमी झाल्याची घटना घडली होती.  धुराचे प्रचंड लोट दिसत होते. स्फोटाच्या ठिकाणापासून तीन किलोमीटर अंतरापर्यंत स्फोटाचा आवाज ऐकू आला.

स्फोटाचा धक्का इतका भीषण होता की, घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि आजूबाजूच्या गाड्या, रस्ते आणि विजेच्या खांबांचे नुकसान झाले. डोंबिवलीतील केमिकल फॅक्टरीच्या मालकाला न्यायालयाने २९ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपी मलय मेहता (वय ३८) अमुदान केमिकल्सचा मालक असून त्याला कल्याणयेथील दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. 

आरोपींवर सदोष मनुष्यवध (कलम ३०४), स्वेच्छेने इजा पोहोचविणे आणि ज्वलनशील पदार्थ आणि स्फोटक पदार्थांच्या बाबतीत निष्काळजीपणे वागणे या कलमान्वये भारतीय दंड संहिते अंतर्गत (आयपीसी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर