Bullet Train Bridge Collapse in Anand Gujarat 3 Dead : देशातील बहुचर्चित प्रकल्प असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे बांधकाम सुरू असतांना एक पूल कोसळल्याने तीन मजूर ठार झाले आहे. ढीगाऱ्याखाली आणखी काही मजूर दबले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही घटना गुजरात येथील आणंद जिल्ह्यातील वासद जवळ मंगळवारी घडली. ४ कामगारांना बाहेर काढण्यात यश आलं असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. माही नदीजवळ सायंकाळी पाचच्या सुमारास पायाभरणीच्या कामासाठी वापरण्यात येत असलेल्या स्टील आणि काँक्रीट ब्लॉकची तात्पुरती रचना बांधकामाच्या ठिकाणी लावली जात असताना ही दुर्घटना घडली.
या अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल व आणंद पोलिसांचं पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालेल आहे. या ठिकाणी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत चार मजुरांना ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे.
या दुर्घटनेत तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीला दोन कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यातील एकाचा मृत्यू झाला. ढिगाऱ्याखाली अडकलेला आणखी एक कामगारही मृतावस्थेत आढळला. जिवंत कामगारावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत,' अशी माहिती आणंद जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक गौरव जसानी यांनी दिली.
या अपघाताची माहिती मिळताच नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे (NHSRCL) अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. एनएचएसआरसीएल बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम करत असून एनएचएसआरसीएलने या घटनेनंतर एक निवेदन जारी करत या अपघाताची माहिती दिली आहे. यामध्ये म्हटलं आहे की आनंद येथील बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या बांधकामाच्या ठिकाणी काँक्रीटचे ब्लॉक कोसळले असून यात काही मजुरांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेनंतर तातडीने मदत व बचावकार्य हाती घेतलं असून यात आनंद पोलील व अग्निशमन दलाचे अधिकारी हे बचाव कार्य राबवत आहे. सर्व परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत.
गेल्या काही महिन्यांत बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या ठिकाणी झालेला हा दुसरा जीवघेणा अपघात आहे. यावर्षी ऑगस्ट महिन्यात वडोदरा जिल्ह्यातील कंबोला गावाजवळ बांधकाम क्रेनचा काही भाग कोसळून एका मजुराचा मृत्यू झाला होता, तर सहा जण जखमी झाले होते.
मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉर हा भारतातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प ५०८ किलोमीटरचा असून त्यात ताशी ३२० किलोमीटर वेगाने गाड्या धावतील, अशी अपेक्षा आहे. या प्रकल्पात जपानी शिंकानसेन तंत्रज्ञानाचा समावेश आहे आणि दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ सहा तासांवरून दोन तासांपर्यंत कमी करण्याचे उद्दीष्ट आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट २०२४ मध्ये घोषणा केली होती की २०२६ मध्ये दक्षिण गुजरातमधील सुरत ते बिलीमोरा दरम्यान हायस्पीड ट्रेन सुरू होईल. या प्रकल्पा अंतर्गत गुजरातमधील पाच स्थानकांची कामे शेवटच्या टप्प्यात आली आहे. तर महाराष्ट्रातील तीन स्थानकांची कामे सुरू करण्यात आली आहे. यात बोईसर, विरार स्थानकांचा समावेश आहे. मुंबई-अहमदाबाद दरम्यान ५०८ किमी लांबीच्या बुलेट ट्रेन मार्ग उभारण्यात येत आहे.