मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  नीलगायीची शिकार करणं आलं अंगलट; २ सिंहिणी विहिरीत पडल्या, एकीचा पाण्यात बुडून मृत्यू

नीलगायीची शिकार करणं आलं अंगलट; २ सिंहिणी विहिरीत पडल्या, एकीचा पाण्यात बुडून मृत्यू

Jul 08, 2024 06:15 PM IST

Gujarat News : शिकारीचा प्रयत्न करताना दोन सिहिंणी एका विहिरीत कोसळल्या.यातील एका सिंहिणीचा मृत्यू झाला आहे. ही घटना गीर (पूर्व) येथील सरसिया रेंजमध्ये घडली.

विहिरीत पडून सिहिणीचा मृत्यू (संग्रहित छायाचित्र)
विहिरीत पडून सिहिणीचा मृत्यू (संग्रहित छायाचित्र)

गुजरात राज्यातील अमरेली येथील गीर (पूर्व) मधील एका गावाजवळ नीलगायीची शिकार करणे दोन सिंहिणींच्या चागलंच अंगलट आलं आहे. शिकारीचा प्रयत्न करताना दोन सिहिंणी एका विहिरीत कोसळल्या. यातील एका सिंहिणीचा मृत्यू झाला आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना गीर (पूर्व) येथील सरसिया रेंजमधील धारी गावाजवळ धारी-कुबड़ा रस्त्यावरील शंभू रुदानी यांच्या कृषी फार्मवर घडली.

ट्रेंडिंग न्यूज

गीर (पूर्व) चे उप वन संरक्षक (DCF) राजदीपसिंह जाला यांनी सांगितले की, शुक्रवार रात्री किंवा शनिवारी सकाळी दोन सिंहिणी एका नीलगायीचा पाठलाग करताना उघड्या विहिरीत कोसळल्या. शेतकऱ्यांनी सकाळी साडे सात वाजता वनविभागाला याची सूचना दिली. जाला यांनी सांगितले की, विहिरीजवळ दोन सिंहिणी आणि एका नीलगायीच्या पायाचे ठसे दिसत आहेत. यामुळे अंदाज वर्तवला जात आहे की, दोन सिंहिणी नीलगायीची शिकार करण्याच्या प्रयत्नात विहिरीत कोसळल्या. मात्र नीलगाय या हल्ल्यात वाचली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, जाला यांनी सांगितले की, वनविभागाच्या पथकाने एका सिंहिणीचा जीव वाचवण्यात यश मिळवले आहे. मात्र दुसऱ्या सिंहिणीचा मृत्यू झाला. दोन्ही सिंहिणी सात सिंहांच्या झुंडीत रहात होत्या. या सिंहांनी सरसिया रेंजमधील धारी गावाजवळ आपला निवारा बनवला आहे.

जाला यांनी सांगितले की, ज्या विहिरीत सिंहिणी पडल्या होत्या ती विहिरी बंदिस्त नव्हती. डीसीएफने म्हटले की, विहिरीला कुंपण व जाळी लावलेली नव्हती. विहिर बंदिस्त असती तर ही घटना टाळता आली असती.

वन अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंत वन विभागाने सरसिया रेंजमध्ये १२,२२५ विहिरींना कुंपण घालण्यात शेतकऱ्यांची मदत केली आहे. मात्र अनेक विहिरी उघड्या आहेत. त्यामुळेच अशा घटना घडत आहेत. 

वन विभागाकडून विहिरी बंदिस्त करण्यासाठी तसेच जंगली पशूपासून संभाव्य दुर्घटना रोखण्यासाठी शेतकऱ्यांना प्रत्येक विहिरीमागे १४,४०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते. 

जाला यांनी सांगितले की, पशू परिसरात फिरत असताना शेतातील विहिरी त्यांच्यासाठी धोकादायक बनत आहेत. विहिरीत पडलेल्या सिंहिणीला कोणत्या गंभीर स्वरुपाची दुखापत झाली नाही. तिच्यावर लक्ष ठेवले जात आहे. तिला धारीजवळ अंबरडी सफारी पार्कमधील एका बचाव केंद्रात आणले गेले आहे.

WhatsApp channel
विभाग