यूपीच्या चंदौलीमध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे. इथं लग्नात चपाती देण्यास उशीर झाल्याने नवरदेव इतका संतापला की त्याने लग्नाला नकार दिला. इतकंच नाही तर लग्न मंडपातून पळून गेला अन् त्याच रात्री त्याने एका नातेवाईकाच्या दुसऱ्या मुलीशी लग्न केले. इकडे वधू हातात मेहंदी लावून वधूच्या पोशाखात त्याची वाट पाहत राहिली. जेव्हा तिला नवरदेव बेपत्ता झाल्याची बातमी कळली तेव्हा तिला खूप वाईट वाटले. पीडित वधूने बुधवारी पोलिसात धाव घेत एसपी आदित्य लंघे यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती. एसपींच्या आदेशाने पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही बाजूंमध्ये समेट घडवून आणली.
चंदौलीतील मुगलसराय कोतवाली परिसरातील औद्योगिक नगर चौकी परिसरातील हमीदपूर येथे ही घटना घडली. माध्यमांशी बोलताना पीडितेने सांगितले की, सात महिन्यांपूर्वी तिचे गावातील मेहताब नावाच्या तरुणाशी लग्न ठरले होते. हा विवाह सोहळा २२ डिसेंबर रोजी होणार होता. मुलीकडील लोकांनी जल्लोषात लग्नाची तयारी केली होती. वऱ्हाड आल्यावर मिठाई देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर लग्नसमारंभात भोजनास सुरुवात झाली. यावेळी रोटी मिळायला उशीर झाल्याचे सांगून एका व्यक्तीने गोंधळ घातला.त्याचे ऐकून अन्य वऱ्हाडी मंडळीही खवळले व गदारोळ सुरू झाला.
वधूचे कुटुंबीय आणि नातेवाईक वराकडील मंडळींना समजावत राहिले पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. हा प्रकार पाहून वरालाही राग आला व तो लग्न मंडपातून तडक उठून निघून गेला. वऱ्हाडीही माघारी गेले. यानंतर काही वेळाआधी लग्नाची धूमधाम असलेल्या वधूच्या घरात शांतता व दु:ख पसरले. त्यानंतर काही तासांने त्याच गावातील एका नातेवाईकाच्या मुलीशी मुलाचे लग्न झाले, असा आरोप वधूने केला आहे. येथे पीडित मुलगी हातात मेंदी घेऊन वधूच्या वेशभूषेत वराची वाट पाहत बसली होती. या संपूर्ण घटनेमुळे पीडितेच्या घरात शोक आणि संतापाचे वातावरण आहे. वधू आणि तिच्या कुटुंबियांनी २४ डिसेंबर रोजी एसपी कार्यालय गाठून घटनेची तक्रार केली.
लग्नात वराकडील सुमारे दोनशे लोक आल्याचे पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे. त्यांची व्यवस्था करण्यासाठी बराच पैसा खर्च करण्यात आला. दीड लाख रुपयांचा हुंडा दिल्याचेही सांगितले आहे. एकूण सुमारे सात लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी पीडितेने एफआयआर दाखल करून कारवाईची मागणी केली आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांनी यापूर्वी इंडस्ट्रियल नगर पोलिस चौकीत तक्रार केली होती, परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. त्यानंतर बुधवारी त्यांनी एसपी आदित्य लंघे यांना अर्ज देऊन या प्रकरणाची तक्रार केली. शुक्रवारी दोन्ही बाजुंना समजावून प्रकरण मिटवण्यात पोलिसांना यश आले.
संबंधित बातम्या