Delhi murder : दिल्ली येथील आदर्श नगर परिसरातील आझादपूर गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यसनी तरुणानं पेन्शनच्या पैशासाठी आपल्या ९३ वर्षीय आजोबांना निर्वस्त्र करत काठीनं बेदम मारहाण करून त्यांची हत्या केली. भोजराज असं हत्या करण्यात आलेल्या आजोबाचं नाव आहे. ते लष्करात हवालदार होते. त्यांनी १९६२ आणि १९६५ च्या युद्धात सहभाग घेतला होता. ही घटना गेल्या सोमवारी घडली. वृद्धाचा आरोपी नातू फरार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भोजराज हे १९८५ मध्ये लष्करातून निवृत्त झाले होते. ते दिल्ली परिसरातील आझादपूर गावात राहत होते. त्यांनी त्यांची दोन मुले सुरेश आणि जयवीर यांच्यासाठी स्वतंत्र घर देखील बांधून दिले होते. दोन्ही मुले जवळच्या घरात तर वडील एका खोलीत एकटेच राहत होते. भोजराज यांची काळजी घेण्याची जबाबदारी जयवीरच्या कुटुंबावर होती.
सुरेश यांचा मुलगा प्रदीप हा व्यसनी आहे. त्याची पत्नी व तीन मुलांना सोडून त्याने दुसऱ्या महिलेसोबत राहतो. भोजराज त्याच्या निवृत्ती वेतनातील अर्धा भाग त्याचा धाकटा मुलगा जयवीरला व अर्धा भाग प्रदीपच्या पहिल्या पत्नीला देत होते. पहिली पत्नी तिच्या मूळ गावी एटा येथे राहत होती. प्रदीपला पेन्शन मिळावी, अशी इच्छा होती, पण भोजराजने पेन्शन देण्यास नकार दिला होता. यामुळे आरोपी संतापला होता.
धाकटा मुलगा जयवीर दुपारी भोजराज यांच्यासाठी जेवण घेऊन आला होता. त्याला त्याचे वडील खोलीत निरवस्त्र व जखमी अवस्थेत आढळले. त्यांनी तत्काळ पोलीस व रुग्णवाहिकेला बोलावले व त्यांना दवाखान्यात भरती केले. बीजेआरएम रुग्णालयात त्यांना नेले असता डॉक्टरांनी भोजराज यांना मृत घोषित केले. तपासादरम्यान प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, सोमवारी दुपारी प्रदीप दादा भोजराज यांच्या खोलीत गेला. त्याने भोजराज यांना शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांना निरवस्त्र करत त्यांच्या चालण्याच्या काठीने त्यांना मारहाण करून हत्या केली. या घटनेत भोजराज हे गंभीर जखमी झाले होते. घटनेनंतर प्रदीप फरार झाला आहे. पोलिसांनी बुधवारी शवविच्छेदन करून भोजराज यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला.
चीन आणि पाकिस्तानविरुद्धच्या युद्धातही भोजराज लढले होते. मोठा मुलगा सुरेशने सांगितले की, १९६२ मध्ये वडील युद्धात भाग घेण्यासाठी अरुणाचल प्रदेशात गेले होते. त्यानंतर १९६५ मध्ये त्यांनी राजस्थान सीमेवर पाकिस्तानसोबतच्या लढाईत भाग घेतला. या सेवेदरम्यान भोजराजला काही पदकेही मिळाली.
पोलिसांनी सांगितले की, खून केल्यावर आरोपी प्रदीप नत्थुपुरा येथील त्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडे गेला. त्याने हत्येची माहिती देऊन तिला पळून जाऊ असे सांगितले. मात्र, महिलेने नकार दिल्याने त्याने फोन बंद केला आणि तेथून पळ काढला. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी बुरारी परिसरात लपून बसला आहे. सध्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे.