durbar hall : राष्ट्रपती भवनातील प्रख्यात दरबार हॉल व अशोक हॉलचे नामांतर, काय आहे कारण?
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  durbar hall : राष्ट्रपती भवनातील प्रख्यात दरबार हॉल व अशोक हॉलचे नामांतर, काय आहे कारण?

durbar hall : राष्ट्रपती भवनातील प्रख्यात दरबार हॉल व अशोक हॉलचे नामांतर, काय आहे कारण?

Jul 25, 2024 04:27 PM IST

Rashtrapati Bhavan News : राष्ट्रपती भवनातील दोन प्रसिद्ध सभागृहे दरबार हॉल व अशोक हॉलची नावं बदलण्यात आली आहेत.

राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल व अशोक हॉलचे नामांतर, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल व अशोक हॉलचे नामांतर, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Rashtrapati Bhavan News : राष्ट्रपती भवनात भारतीय सांस्कृतिक मूल्यांचे प्रतिबिंब उमटावं या हेतूनं 'दरबार हॉल' आणि 'अशोक हॉल' या दोन प्रतिष्ठित सभागृहांची नावं बदलण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. त्यानुसार दरबार हॉलचं नामांतर 'गणतंत्र मंडप' आणि अशोक हॉलचं नामांतर 'अशोक मंडप' असं करण्यात आलं आहे.

'राष्ट्रपती भवन, राष्ट्रपतींचं कार्यालय आणि निवासस्थान हे देशाचं प्रतीक आणि जनतेचा अमूल्य वारसा आहे. राष्ट्रपती भवनाच्या वास्तूला अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इथल्या वातावरणात भारतीय सांस्कृतिक मूल्ये प्रतिबिंबित व्हावीत, असाही प्रयत्न आहे. हे नामांतर हा त्याचाच भाग आहे, असं राष्ट्रपती सचिवालयानं गुरुवारी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या दोन महत्त्वाच्या सभागृहांच्या नामांतराबद्दल आनंद व्यक्त केल्याचंही निवेदनात म्हटलं आहे.

दरबार हॉल का महत्त्वाचा?

राष्ट्रपती भवनातील 'दरबार हॉल'मध्ये राष्ट्रीय पुरस्कार वितरणासारखे महत्त्वाचे समारंभ आणि सोहळे आयोजित केले जातात. 'दरबार' हा शब्द भारतावर राज्य करणाऱ्या शासकांच्या आणि इंग्रजांच्या न्यायालयासाठी वापरतात. हा शब्द पारतंत्र्याची आठवण देणारा आहे. 

भारत देश प्रजासत्ताक झाल्यानंतर अशा प्रतीकांची प्रासंगिकता उरलेली नाही. प्राचीन काळापासून भारतीय समाजात 'गणतंत्र' ही संकल्पना खोलवर रुजली असून, 'गणतंत्र मंडप' हे या स्थळासाठी योग्य नाव असल्याचं मत बनलं.

अशोक हॉलचं ‘अशोक मंडप’ का केलं?

राष्ट्रपती भवनाचा अशोक हॉल हा मुळात बॉलरूम होता. या हॉलचं नाव प्राचीन भारतातील सम्राट अशोक यांच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे. सम्राट अशोक यांचा शासन काळ भारतातील सर्वसमावेशक व सहिष्णू मानला जातो. अशोक या शब्दाला विशेष अर्थही आहे. अशोक म्हणजे, सर्व दु:खापासून मुक्त किंवा कोणत्याही दु:खापासून अलिप्त. त्यामुळं अशोक हॉल हा भारतीय संस्कृतीशी नातं सांगणारा आहे. मात्र, त्यातील हॉल हा शब्द इंग्रजीकरणाच्या खुणा जपणारा होता. त्यामुळं अशोक हॉलचं अशोक मंडप करण्यात आलं आहे. शिवाय, त्यामुळं दोन्ही नावांमध्ये सारखेपणा येतो.

प्रियांका गांधी काय म्हणाल्या?

राष्ट्रपती भवनातील दोन प्रसिद्ध सभागृहांची नावं बदलण्याच्या निर्णयावर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी प्रतिक्रिया दिली. 'ही दरबाराची संकल्पना नसून शहेनशाहची आहे, असं त्या म्हणाल्या. त्यांच्या रोख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडं होता.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर