Sukanya Samriddhi Yojana : मोदी सरकारने नवीन वर्षाचे मोठे गिफ्ट दिले आहे. १ जानेवारीपासून जानेवारी-मार्च तिमाहीसाठी सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याजदर ८ वरुन ८.२० टक्के इतके वाढवले आहे. पोस्टातील तीन वर्षांच्या मुदत ठेवींच्या व्याजदरात १० आधार बिंदूंची वाढ करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला असून इतर सर्व अल्प बचत योजनांचे दर हे कायम ठेवण्यात आले आहेत.
नवीन वर्षात केंद्र सरकारने पुन्हा घोषणांचा पाऊस पाडला आहे. याचाच एक भाग म्हणून आता सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत ठेवींवरील व्याजदर वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या संदर्भातील घोषणा शुक्रवारी अर्थमंत्रालयाने केली आहे. सरकारने चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याजदरात ०.२० टक्के आणि तीन वर्षांच्या मुदत ठेव योजनेवरील व्याजदरात ०.१० टक्के वाढ करत गुणवणूकदारांना दिलासा दिला आहे.
या नव्या घोषणेनुसार आता सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत ठेवींवरील व्याजदर सध्याच्या ८ टक्क्यांवरून ८.२ टक्के करण्यात आला आहे. तर तीन वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याज दर हे ७ टक्क्यांवरून ७.१ टक्के करण्यात आले आहे. समृद्धी योजनेत ०.२० टक्के तर ३ वर्षांच्या ठेवी दरात ०.१० टक्के वाढ झाली आहे. केंद्र सरकारने पोस्ट ऑफिस बचत खात्यावर ४ टक्के व्याजदर राहणार आहे. तर वर्षभराच्या ठेवीचा व्याज दर ६.९ टक्के असणार आहे.
पीपीएफ किंवा सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. PPF च्या व्याजदरात ३ वर्षांपेक्षा जास्त काळ बदल झालेला नाही. ते एप्रिल-जून २०२० मध्ये शेवटचे बदलले होते. केंद्र सरकारने ५ वर्षांच्या आवर्ती ठेव दरांमध्ये किंचित वाढ केली होती. याशिवाय ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीसाठी लहान बचतमुदतीवर व्याजदर समान पातळीवर ठेवण्यात आले होते.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील व्याजदर ७.७ टक्के तर २ वर्षांच्या ठेवीचा व्याज दर ७.० टक्के राहणार आहे. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचे व्याजदर आहे तेच ठेवण्यात आले आहे. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीमवरील व्याज हे बँक एफडीवरील व्याजापेक्षा जास्त असल्याने यात गुंतवणूक आता वाढणार आहे.