Modi News: २०१४ च्या निवडणुकीत प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख रुपये टाकण्याच्या आश्वासनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन घोषणा केली आहे. सक्तवसुली संचालनालय म्हणजे ईडीने देशभरातून जप्त केलेली संपत्ती गरीबांमध्ये वितरीत केली जाणार आहे. याची तयारी केली जात असल्याचे मोदींनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये ईडीकडून जप्त केलेली संपत्ती गरीबांमध्ये वाटण्याच्या दिशेने काम केले जात आहे. नुकतेच त्यांनी कृष्णानगर मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या राजमाता अमृता रॉय यांच्याशी फोनवरून संवाद साधला. रॉय तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार महुआ मोइत्रा यांच्या विरोधात निवडणूक लढत आहे.
रॉय यांच्याशी केलेल्या फोनवरील संवाधात मोदींनी याबाबत कायदेशीर मार्ग शोधण्याचा विचार व्यक्त केला. मोदींनी म्हटले की, ज्या गरीबांना लुटून भ्रष्टाचाऱ्यांनी संपत्ती जमा केली. ईडीने त्यांच्याकडील जप्त केलेली संपत्ती पुन्हा गरीबांना मिळणार आहे. मोदींनी विश्वास व्यक्त केला की, पश्चिम बंगाल यावेळी परिवर्तनासाठी मतदान करेल. भाजपाने येथे ३० जागा जिंकण्याचे उदिष्ठ ठेवले आहे.
पंतप्रधान मोदींनी म्हटले की, एकीकडे भाजप देशातून भ्रष्टाचार हद्दपार करण्यासाठी काम करत आहे, तर दुसरीकडे सर्व भ्रष्टाचारी एकमेकांना वाचवण्यासाठी सोबत आले आहेत. याआधी मोदींनी म्हटले होते की, यूपीए सत्ताकाळात तपास यंत्रणांचा वापर केवळ राजकीय स्वार्थासाठी केला गेला. PMLA नुसार आम्ही आधीपेक्षा दुप्पट प्रकरणे नोंद केली आहेत.
आता दलालांना गरीबांना लुटण्यात अडचणी येत आहेत. आम्ही DBT, जनधन, आधार आणि मोबाइल फोनच्या शक्तीला ओळखले आहे. आम्ही लोकांच्या खात्यात थेट ३० लाख कोटी रुपये ट्रान्सफर केले आहेत. काँग्रेसच्या एका पंतप्रधानांनी म्हटले होते, आधी सरकारकडून पाठवलेले १०० रुपयांपैकी केवळ १५ रुपये गरीबांना मिळतात.
संबंधित बातम्या