लम्पी रोगामुळे भारतात गेल्या वर्षात तब्बल १ लाख ८९ हजार जनावरे दगावली होती. परिणामी वर्षभराच्या काळात दुधाचे उत्पादन थंडावले आहे. त्यामुळे आवश्यकता पडल्यास केंद्र सरकार बटर आणि तूप परदेशातून आयात करण्याच्या विचारात आहे. केंद्राच्या या निर्णयावर दूध उत्पादकांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
गेल्या वर्षी आलेल्या लम्पी रोगामुळे भारतात १ लाख ८९ हजार जनावरे दगावली होती. परिणामी २०२२-२३ या आर्थिक वर्षात देशात दुधाच्या उत्पादनात फार वाढ झाली नव्हती. कोरोना संकटानंतर गेल्या आर्थिक वर्षात देशाची परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर आल्याने देशात ८-१० टक्के दुधाची मागणी वाढली आहे, अशी माहिती केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्धविकास खात्याचे सचिव राजेश कुमार सिंह यांनी दिली.
‘सद्यस्थितीत देशात दुधाचा तसा तुटवडा नाही. दूध पावडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. परंतु बटर आणि तूप या दुग्धजन्य पदार्थांचा साठा गेल्या वर्षाच्या तुलनेत मात्र कमी उपलब्ध आहे. दक्षिणेकडील राज्यांमधील दूध उत्पादनाचा हंगाम सध्या सुरू झाला आहे. या राज्यांमधील दुधाची आवक पाहिल्यानंतर आवश्यकता भासल्यास केंद्र सरकार यात हस्तक्षेप करून बटर आणि तूप या दोन दुग्धजन्य पदार्थांची आयात करेल’ अशी माहिती सिंह यांनी दिली. जागतिक बाजारात सध्या दुग्धजन्य पदार्थांच्या किमती वाढलेल्या असल्याने आत्ताच बटर आणि तुपाची आयात करण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी २०११ साली केंद्र सरकारने दूध उत्पादनांची परदेशातून आयात केली होती.
दूध उत्पादकांकडून कडाडून विरोध
दरम्यान, केंद्राने घी आणि बटर परदेशातून आयात केल्यास त्याचा देशांतर्गत दूध उत्पादकांच्या उत्पन्नावर थेट परिणाम होईल, असं मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्ध उत्पादन खात्याचे मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांना उद्देशून शरद पवार यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी केंद्राला घी आणि बटरचे आयात न करण्याचा सल्ला दिला आहे. ‘देशांतर्गत दूध उत्पादक आत्ता कुठे कोविडच्या परिस्थितीतून हळूहळू सावरत असून या निर्णयामुळे भारतातील डेअरी उद्योगाला मोठा फटका बसेल’, असं शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे.
संबंधित बातम्या