Cyber Crime news : गुगलने दोन गुंतवणूक ॲप्सवर बंदी घातली आहे. गुरुग्राम पोलिसांनी गुगलच्या नोडल ऑफिसरला नोटीस पाठवून प्ले स्टोअरवरून हे ॲप्स काढून टाकण्यास सांगितले होते. या ॲप्सद्वारे सायबर गुन्हेगार हे वापरकर्त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवत होते.
बनावट ॲप्सद्वारे सायबर चोरटे अनेकांना गंडा घालत असल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ऑनलाइन घोटाळ्यांपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी, गुगल दररोज प्ले स्टोअरवरुन असे बनावट ॲप्स काढून टाकत आहे. गुगलने आणखी दोन गुंतवणूक ॲप्सवर बंदी घातली आहे. रिपोर्टनुसार, गुरुग्राम पोलिसांनी गुगलच्या नोडल अधिकाऱ्यांना या बाबत नोटीस पाठवली होती. त्यानुसार प्ले स्टोअरवरून हे ॲप्स काढून टाकण्यास सांगितले होते. गुगलने नोटीस मिळताच हे ॲप्स प्ले स्टोअरवरून काढून टाकल्याचे सांगण्यात येत आहे. FHT आणि SS- Equitrade अशी या प्रतिबंधित ॲप्सची नावे आहेत.
गुरुग्राम सायबर क्राइम पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी म्हणाले, या ॲप्सद्वारे फसवणूक करणारे नागरिकांना त्यांच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवत होते. FHT ॲप सुमारे १.५५ लाख नागरिकांनी डाउनलोड केल्याचे तपासात आढळून आले आहे. पोलिसांनी हे ॲप्स वापरणाऱ्यांना आवाहन केले आहे की, संपूर्ण माहितीशिवाय गुंतवणुकीच्या नावाखाली कोणालाही पैसे ट्रान्सफर करू नका. असे केल्याने सायबर फसवणूक होण्याशी शक्यता अधिक आहे.
गुगलने २०२३ मध्ये प्ले स्टोअरवर २२.८ लाख ॲप्स काढून टाकले होते. त्याचप्रमाणे, २०२२ मध्ये, गुगलने १४.३ लाख ॲप्स प्ले स्टोअरवर टाकण्यास परवानगी दिली नाही. कंपनीने प्ले स्टोअरवरील ३.३३ लाख धोकादायक डेव्हलपर खात्यांवर बंदी घातली आहे.
कंपनीने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की हे ॲप्स वापरतांना अधिक सुरक्षा उपाय कंपनीतर्फे करण्यात येतील जेणेकरून नागरिकांची फसवणूक होणार नाही. एसएमएस यासारख्या संवेदनशील परवानग्यांसाठी २ लाख ॲप सबमिशन नाकारण्यात आले. तसेच या ॲप्सचे पुनरावलोकन गुगलने केले. गुगलने सांगितले की मोठ्या स्तरावर वापरकर्त्यांची गोपनीयता सुरक्षित करण्यासाठी त्यांनी SDK (सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट्स) प्रदात्यांशी करार केला आहे. ३१ SDK कंपनी ही वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी ७,९०,००० पेक्षा जास्त ॲप्सवर संवेदनशील माहिती रोखण्यासाठी सुरक्षेचे उपाय करणार आहे.
संबंधित बातम्या