यूपीत पुन्हा एकदा रेल्वे अपघाताची घटना समोर आली आहे. फतेहपूर जिल्ह्यातील खागाजवळ मंगळवारी सकाळी उभ्या असलेल्या मालगाडीला दुसऱ्या मालगाडीने धडक दिली. दोन मालवाहू गाड्या एकमेकांना धडकल्याने गार्डचा डबा आणि इंजिन रुळावरून घसरले. मालगाडीच्या धडकेत दोन लोको पायलट जखमी झाले आहेत. अपघाताचे वृत्त समजताच रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरवर सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. उत्तर मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शशिकांत त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर'अंतर्गत येते. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचे असिस्टंट जनरल मॅनेजर मनू प्रकाश दुबे यांनी सांगितले की, मागून येणाऱ्या मालगाडीत लोको पायलट शिवशंकर यादव आणि आणखी एक सहाय्यक लोको पायलट अनुज राज उपस्थित होते. एक मालगाडी उभी होती, त्या दरम्यान पाठीमागून येणाऱ्या मालगाडीच्या लोको पायलटला झोप लागली, यामुळे मालगाडी समोर उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली.
मागील मालगाडीचे दोन लोको पायलट किरकोळ जखमी झाले असून प्राथमिक उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. क्रेनच्या साहाय्याने दोन्ही मालगाड्या रुळावर आणण्यात आल्या. न घसरल्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली वाहतूक सुरळीत करण्यात आली, अशी माहिती दुबे यांनी दिली. तांत्रिक अधिकाऱ्यांचे पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. प्रयागराज परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक प्रेमकुमार गौतम यांनी सांगितले की, लोको पायलटने झोप घेतली असावी, ज्यामुळे हा अपघात झाला असावा.
संबंधित बातम्या