Special leaves to assam govt employee : आई-वडील व सासू-सासऱ्यांसोबत वेळ घालवण्यासाठी, त्यांच्यासोबत फिरण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना विशेष सुट्टी देण्याचा निर्णय आसाम सरकारनं घेतला आहे. कौटुंबिक संबंध दृढ करण्याचा उद्देश यामागे आहे.
आसाम सरकारनं दिलेली ही रजा दोन दिवसांची विशेष प्रासंगिक रजा असेल. ही रजा नोव्हेंबर महिन्यात मिळेल. मुख्यमंत्री हिंमता बिस्व सरमा यांच्या कार्यालयानं (CMO) गुरुवारी ही माहिती दिली. विशेष रजा वैयक्तिक मनोरंजनासाठी वापरली जाऊ शकत नाही. तसंच, ज्या कर्मचाऱ्यांना आई-वडील किंवा सासरे नाहीत त्यांना रजेचा हक्क मिळणार नाही, असंही सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे.
कामाच्या व्यग्रतेत अनेकदा वृद्ध आई-वडील व इतर कुटुंबीय दुर्लक्षित राहतात. आठवड्याला एक सुट्टी मिळाली तरी ती कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीमध्ये जाते किंवा या सुट्टीत कर्मचारी स्वत:चे स्वतंत्र प्लान ठरवतात. अशा वेळी घरातील वृद्धांची कुचंबणा होते. ही कुचंबणा दूर करण्यासाठी, त्यांचा आदर-सन्मान करण्यासाठी व त्यांची काळजी घेण्याच्या दृष्टीनं ही विशेष रजा महत्त्वाची मानली जात आहे.
यंदाची सुट्टी कधी घेता येईल हे देखील मुख्यमंत्री कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. यंदा येत्या ७ नोव्हेंबरला छठपूजा आहे. त्यानंतर मध्ये ८ तारखेचा दिवस आहे. त्याला लागून ९ नोव्हेंबरला दुसरा शनिवार आणि १० नोव्हेंबरला रविवार आहे. त्यामुळं यंदा ७ व ८ नोव्हेंबरला ही सुट्टी घेता येणार आहे. अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणारे कर्मचारी टप्प्याटप्प्याने रजा घेऊ शकतात. मुख्यमंत्री हिंमता बिस्व सरमा यांनी २०२१ मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर स्वातंत्र्यदिनी केलेल्या पहिल्या भाषणात या विशेष सुट्ट्यांची घोषणा केली होती.
संबंधित बातम्या