Uttarakhand Viral Video: उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे रात्रीच्या वेळी दुचाकीने जाणाऱ्या दोन महिलांचा मार्ग पाठलाग करून त्यांच्यासोबत गैरवर्तन करण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून त्यांचे वाहने जप्त करण्यात आली. या घटनेतील आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीने जोर धरला आहे. मात्र, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर झाल्यानंतर पुन्हा एकदा महिलेच्या सुरक्षतेबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हल्द्वानी शहरात काल रात्री वाहनाने मुलींचा पाठलाग केल्याच्या व्हायरल व्हिडिओची एसएसपी नैनीताल यांनी तात्काळ दखल घेतली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही वाहनांतून जाणाऱ्या तरुणांना पोलिसांनी पकडले आहे. नैनीताल पोलिसांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये आयपीएस प्रल्हाद नारायण मीणा यांचा व्हिडिओ आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुखणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. तरुणींनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून त्या दोघी रात्री १०.३० वाजता चित्रपट पाहून घरी परत येत असताना त्यांच्यासोबत हा प्रकार घडला. आरोपी तरुणांना सुमारे २५ मिनिटे त्यांचा पाठलाग केला. तरुणींनी हिंमत दाखवून आरोपींचा व्हिडिओ बनवला. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, स्कॉर्पिओ स्वार असलेला एक तरुण गाडीचा दरवाजा उघडून खाली उतरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर तो पुन्हा गाडीत चढतो. मुखणी चौकात येताच आरोपी तेथून पळून जातात. व्हिडिओमध्ये दोन्ही कारचे नंबर दिसत आहेत.
व्हिडिओ एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर २८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७.१५ वाजता शेअर करण्यात आला होता. तेव्हापासून मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर याला जवळपास ३२,००० व्ह्यूज मिळाले आहेत.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी हा व्हिडिओ शेअर करत उत्तराखंड पोलीस आणि मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना टॅग करून आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नैनितालचे एसएसपी प्रल्हाद मीना यांनी सांगितले की, पीडित तरुणींनी तक्रार दाखल केली आहे. व्हिडिओची दखल घेत कारवाई करण्यात आली. नैनिताल पोलिसांनी आरोपींना त्यांच्या कारमधून ट्रेस करताच अटक केली. एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.तसेच दोन्ही वाहने जप्त करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.