प्रियकराने लग्नास नकार दिल्याने निराश झालेल्या एका २२ वर्षीय तरुणीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी रात्री उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यात घडली. सकाळी तिचा मृतदेह सापडल्याने गावात एकच खळबळ उडाली. या घटनेपूर्वी तिने प्रियकराच्या व्हॉट्सअॅप नंबरवर मेसेज पाठवला होता. त्यावर लिहिले होते, 'मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, माझा मृतदेह घराजवळील विहिरीत सापडेल'. पोलिसांनी माहिती घेऊन तपास करत तरुणीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.
मेहनाजपूरमधील एका गावात राहणाऱ्या या तरुणीचे जौनपूर जिल्ह्यातील चांदवाक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चक्र नारायणपूर गावातील एका तरुणासोबत अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. दोघांची अनेकदा भेट होत असे. याची कल्पना कुटुंबीयांना आली. त्यांनी तरुणीला तिच्या प्रियकराला भेटण्यास मज्जाव केला. गुरुवारी मुलीच्या घरी पंचायत बसवली होती. यावेळी प्रियकराचे कुटुंबीयही उपस्थित होते. पंचायतीमध्ये दोघांच्या कुटुंबीयांनी लग्नाला होकार दिला आणि तारीखही निश्चित करण्यात आली. गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास या तरुणीचे अंकितशी फोनवर बोलणे झाले.
यावेळी प्रियकराने लग्नास नकार देत फोन कट केल्याचे सांगण्यात आले. यामुळे तरुणी दुखावली गेली. तिने बॉयफ्रेंडच्या व्हॉट्सअॅप नंबरवर मेसेज पाठवला. 'मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, माझा मृतदेह माझ्या घराजवळील विहिरीत सापडेल,' असं तिने लिहिलं . तरुणी मध्यरात्रीच घरातून गायब झाली होती.
कुटुंबीयांनी तिचा गावात सर्वत्र शोध घेतला. सकाळी मुलीच्या वडिलांनी मेहनाजपूर पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. यानंतर त्यांनी घरी पोहोचून मुलीचा मोबाइल तपासला. हा निरोप वाचून ते घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीकडे धावला. तरुणीचा मृतदेह विहिरीत पडला होता. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोन तासांच्या प्रयत्नानंतर गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह कसाबसा बाहेर काढण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.