Ghaziabad Viral Video: आजची तरुण पिढी रील बनवण्यासाठी जीव धोक्यात घालायलाही मागेपुढे पाहत नाही. रीलमुळे आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आता उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून एक धक्कादायक बातमी समोर आली. बाल्कनीत रील बनवताना १६ वर्षीय मुलगी चक्क सहाव्या मजल्यावरून खाली पडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गाझियाबादमधील इंदिरापुरम येथील एका सोसायटीच्या सहाव्या मजल्याच्या बाल्कनीत संबंधित मुलगी रील बनवत होती. इतक्यात तिच्या हातातून फोन निसटला. फोन पकडण्याच्या प्रयत्नात ती स्वत: खाली पडली. व्हायरल व्हिडिओत आपण पाहू शकतो की, मुलगी जमीनीवर पडलेली दिसत आहे. अनेक जण मुलीला हॉस्पिटलमध्ये नेण्याचा प्रयत्न करत असतानाच मुलीच्या आईने तिच्यावर चिडून तिला शिवीगाळ करत आहे. व्हिडिओत मुलगी वेदनेने ओरडत आहे आणि तिच्या वडिलांना कॉल करण्यास सांगत आहे. मुलगी रुग्णालयात पोहोचली असून तिच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुलीची आई बोलत आहे की, 'मुलीच्या आईने सांगितले की, तू माझे ऐकले नाहीस, तू खूप नालायक मुलगी आहेस. आई-वडिलांचे नाव खराब केले.' हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
एका सोशल मीडिया वापरकर्त्याने लिहिले आहे की, लोक रील बनवण्याच्या नादात आपले आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत, हे लोक का समजू शकत नाहीत. दुसऱ्याने कमेंट करताना असे म्हटले आहे की, हे जगाचे सत्य आहे, आता इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्स आता उपयोगी येणार नाहीत, फक्त आई-वडीलच तिची काळजी घेतील. आणखी एका व्यक्तीने लिहिले आहे की, 'रीलच्या नावाखाली आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांना जेव्हा आपण समजावून सांगतो, तेव्हा ते आपल्याला ज्ञान देण्यास सुरुवात करतात आणि मग असे अपघात समोर येत राहतात.' एकाने म्हटले आहे की, 'अशा घटना वाढत आहेत आणि लोकांना जीव गमवावा लागत आहे, सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करावा.'