bypoll results 2023 : इंडिया आघाडीची पहिल्या विजयाच्या दिशेनं वाटचाल, यूपीतील पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत मोठी आघाडी
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  bypoll results 2023 : इंडिया आघाडीची पहिल्या विजयाच्या दिशेनं वाटचाल, यूपीतील पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत मोठी आघाडी

bypoll results 2023 : इंडिया आघाडीची पहिल्या विजयाच्या दिशेनं वाटचाल, यूपीतील पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत मोठी आघाडी

Sep 08, 2023 01:47 PM IST

UP Ghosi bypoll results 2023 : उत्तर प्रदेशातील घोसी विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीच्या उमेदवारानं मोठी आघाडी घेतली आहे. भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे.

India Alliance
India Alliance

India Alliance Vs BJP in Ghosi : देशाच्या सहा राज्यातील सात जागांवर झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाची मतमोजणी आज सुरू आहे. मात्र, उत्तर प्रदेशातील घोसी पोटनिवडणुकीच्या निकालाकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. नव्यानं स्थापन झालेली इंडिया आघाडी विरुद्ध भाजप असा थेट सामना इथं असून सध्या ‘इंडिया’नं भाजपवर आघाडी घेत पहिल्या विजयाच्या दिशेनं वाटचाल केली आहे.

उत्तर प्रदेशातील घोसी, उत्तराखंडमध्ये बागेश्वर, केरळमध्ये पुथुपल्ली, पश्चिम बंगालमध्ये धुपगुडी, झारखंडमध्ये डुमरी आणि त्रिपुरात बॉक्सानगर आणि धनपूर अशा सात विधानसभा मतदारसंघात ५ सप्टेंबर रोजी निवडणूक झाली होती. सात पैकी दोन जागा भाजपनं जिंकल्या असून एका मतदारसंघात आघाडी घेतली आहे. तर, इतरत्र अन्य पक्ष आघाडीवर आहेत.

यूपीतील घोसीमध्ये इंडिया आघाडीची थेट लढत भाजपविरोधात आहे. इथं समाजवादी पक्षाचे सुधाकर सिंह आणि भाजपचे दारा सिंह चौहान एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. मतमोजणीच्या आतापर्यंतच्या फेऱ्यांंमध्ये सुधाकर सिंह हे आघाडीवर आहेत. भाजपचे दारा सिंह चौहान सातत्यानं मागे पडत आहेत. दोघांमधील मतांचा फरकही बराच वाढला आहे. १२ व्या फेरीअखेर दारा चौहान हे सुधाकर सिंह यांच्यापेक्षा १८ हजार मतांनी पिछाडीवर आहेत. समाजवादी पक्षाचे सुधाकर सिंह यांना ४३ हजारांहून अधिक मतं मिळाली आहेत तर दारा सिंह चौहान यांना २८ हजार मतं मिळाली आहेत.

सिंह आणि चौहान यांच्यातील मतांचं अंतर बघता इंडिया आघाडीचा विजय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रातील भाजप सरकारविरोधात स्थापन झालेल्या इंडियाची भाजपच्या विरोधातील ही पहिलीच निवडणूक आहे. यातील विजय हा इंडिया आघाडीचं मनोधैर्य उंचावणारा ठरणार आहे. येत्या काही महिन्यांत होणाऱ्या पाच राज्यांतील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निकाल अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर