मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  पत्रकाराला ‘सर तन से जुदा’ची धमकी देणारा निघाला जवळचा मित्र!

पत्रकाराला ‘सर तन से जुदा’ची धमकी देणारा निघाला जवळचा मित्र!

HT Marathi Desk HT Marathi
Sep 21, 2022 06:12 PM IST

पत्रकाराला फोनवरून ‘सर तन से जुदा’ची धमकी देणारा आरोपी हा त्याचा जवळचा मित्र निघाला.

Accused Pran Priya Vats, who threatened Delhi based journalist saying Sar tan se juda
Accused Pran Priya Vats, who threatened Delhi based journalist saying Sar tan se juda

‘पाञ्चजन्य’ या हिंदी साप्ताहिकाच्या एका दिल्लीस्थित पत्रकाराच्या मोबाइलवर काही दिवसांपूर्वी अज्ञात क्रमांकाच्या फोनवरून ‘सर तन से जुदा’ म्हणत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून आरोपी हा तक्रारदार पत्रकाराचा जवळचा मित्र असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार पत्रकार निशांत आझाद हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र असलेल्या ‘पाञ्चजन्य’ या साप्ताहिकात कार्यरत आहे. १२ सप्टेंबर रोजी एका आंतरराष्ट्रीय मोबाइल क्रमांकावरून आझादला एक फोन आला होता. इंटरनेट कॉलिंगच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या फोनवरून आझाद याला आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिली होती. यावेळी ‘सर तन से जुदा’ असे शब्द वापरण्यात आले होते. तुम्ही इस्लाम धर्माविरुद्ध काही लिहिल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशीही धमकी फोनवरून आझाद याला देण्यात आली होती. आझाद याने या घटनेची तक्रार गाझियाबाद पोलिसांकडे केली होती.

आरोपी निघाला पत्रकाराचा मित्र!

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव प्राण प्रिय वत्स असे असून तो तक्रारदार पत्रकार निशांत आझाद याचा जवळचा मित्र असल्याचे पोलिसांनी सांगितले. निशांत आणि प्राण प्रिय वत्स यांची अडीच वर्षापूर्वी बिहारमध्ये प्रथम भेट झाली होती. त्यानंतर ते एकमेकांच्या नियमित संपर्कात होते. या दरम्यान आरोपीने निशांतकडून अडीच लाख रुपये उसने घेतले होते. निशांत गेले काही दिवसांपासून पैसे परत मागत होता. निशांतला धमकी दिल्यास त्याच्या मनात भीती निर्माण होऊन तो याप्रकरणात गुंतून जाईल यासाठी त्याने धमकीचा कट रचला होता. राज्यशास्त्र विषयात पदवीधर असलेला आरोपी प्राण प्रिय वत्स याने थेट गुजरात गाठून तेथून एका इन्टरनॅशनल फोन क्रमांकावरून निशांतला धमकी दिल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. इंटरनॅशनल क्रमांकावरून कॉल केल्यास पोलीसांना तपास करता येणार नाही, असा आपला समज होता, अशी कबुली आरोपीने दिली आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या