Sharad Pawar On Gautam Adani : गौतम अदानी प्रकरणावर शरद पवारांची रोखठोक भूमिका, म्हणाले...
Sharad Pawar On Gautam Adani : हिंडेनबर्गच्या आरोपांवर आणि अदानी समुहाच्या चौकशीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच थेटपणे भाष्य केलं आहे.
Sharad Pawar On Gautam Adani : हिंडेनबर्गचा रिपोर्ट आल्यानंतर उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समुहाचे शेयर्स कोसळले होते. त्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप करत अदानी प्रकरणाची जेपीसी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यामुळं आता अदानी प्रकरणावर काँग्रेस आक्रमक झालेली असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अदानी प्रकरणावर रोखठोक भूमिका मांडत राहुल गांधी यांचे चांगलेच कान टोचले आहे. हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर गौतम अदानी यांना टार्गेट करण्यात आलं असून त्यांच्या चौकशीसाठी जेपीसीची आवश्यकता नाहीये. सुप्रीम कोर्टानं नेमलेल्या समितीमार्फतच तपास व्हायला हवा, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसशी विपरीत भूमिका घेत अनेकांना धक्का दिला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, आम्ही हिंडेनबर्ग कंपनीचं नाव कधीही ऐकलेलं नाही. परंतु त्या कंपनीच्या अहवाला गौतम अदानी यांना लक्ष्य केल्याचं दिसून येत आहे. परदेशी कंपनीच्या अहवालाने देशात खळबळ उडालेली आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यांनी यापूर्वीदेखील देशात गदारोळ उडाला होता. परंतु या सर्व प्रकरणामुळं देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी किंमत मोजावी लागू शकते, ही बाब दुर्लक्षित करता येणार नाही, असं म्हणत शरद पवारांनी गौतम अदानी यांचा जोरदार बचाव केला आहे.
अदानी प्रकरणाच्या चौकशीसाठी देशातील विरोधी पक्षांकडून संयुक्त संसदीय समिती अर्थात जेपीसीची मागणी केली जात आहे. परंतु ही मागणी सत्ताधारी पक्षाच्या विरोधातली असल्यामुळं त्यातून सत्य बाहेर येण्याबाबत शंका निर्माण होऊ शकते. उलट सर्वोच्च न्यायालयाच्या समितीनं अदानी प्रकरणाची चौकशी केली तर त्यातून सत्य देशासमोर येईल. त्यामुळं अदानी प्रकरणाच्या चौकशीसाठी जेपीसीची आवश्यकता नसून सुप्रीम कोर्टाच्या समितीकडूनच चौकशी व्हायला हवी, असंही खासदार शरद पवार म्हणालेत.