gautam adani bribery case : अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेतील भारतीय अधिकाऱ्यांना २५० दशलक्ष डॉलर्स (सुमारे १७५० कोटी रुपये) ची मोठी लाच दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. भारतातील सर्वात मोठ्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे कंत्राट मिळवण्यासाठी त्यांनी लाच दिल्याचा आरोप आहे. या आरोपानंतर भारताच्या राजकारणात वादळ उठलं आहे. विरोधी पक्ष कॉंग्रेस या मुद्यावरून आक्रमक झाला असून भारतात देखील अदानी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. संसदेच्या अधिवेशनात या मुद्द्यावर गदारोळ होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, अमेरिकेत गौतम अदानी यांच्या अटकेचे वॉरंट निघाले असून त्यांना या प्रकरणी काय शिक्षा होणार याची चर्चा सुरू झाली आहे.
गौतम अदानी यांच्यावर भ्रष्टाचार आणि फसवणुकीचे आरोप आहेत. गेल्या २० वर्षांत दोन अब्ज डॉलर्सचे सौर कंत्राट मिळवण्यासाठी अदानी यांनी भारतीय अधिकाऱ्यांना २५० दशलक्ष डॉलर्सची लाच दिल्याचा आरोप आहे.
गौतम अदानी सध्या भारतात आहेत. अमेरिकेत त्यांच्या अटकेचे वॉरंट काढण्यात आलं आहे. त्यामुळे अमेरिकन तपास यंत्रणा त्याच्या प्रत्यार्पणाची विनंती भारताला शकते. मात्र, हे आरोप भारतीय कायद्यानुसार लागू होतात की नाही, याचा निर्णय भारतातील न्यायालय घेईल. याव्यतिरिक्त, राजकीय आणि मानवी हक्कांचे मूल्यांकन देखील यापूर्वी केले जाईल. अदानी या प्रत्यार्पणाला विरोध करू शकतात. यामुळे संपूर्ण प्रक्रियेला उशीर होऊ शकतो.
गौतम अदानी यांनी अद्याप कोणत्याही आरोपावर प्रतिक्रिया दिलेली नाही. ते अद्याप अमेरिकेच्या कोणत्याही न्यायालयात हजर झालेला नाही. जर त्यांचे प्रत्यार्पण किंवा आत्मसमर्पण झाले तर त्यांचे वकील या निर्णयाला कोर्टात आव्हान देऊ शकतात. न्यायालयात त्यांच्या विरोधात खटला लवकर सुरू होण्याची शक्यता नाही. कायदेशीर प्रक्रिया, पुराव्यांवरील युक्तिवाद आणि अदानीशी संबंधित इतर आरोपींसाठी स्वतंत्र खटले यामुळे ही प्रक्रिया लांबू शकते. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.
अदानी या प्रकरणी दोषी आढळल्यास त्यांना लाच घेतल्याप्रकरणी पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. फसवणूक आणि कट रचण्याच्या आरोपांमध्ये २० वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. शिवाय त्यांना मोठा दंडही ठोठावला जाऊ शकतो. कोणत्याही शिक्षेचा निर्णय शेवटी खटला हाताळणाऱ्या न्यायाधीशावर अवलंबून असतो. रॉयटर्सने ही माहिती दिली आहे. अदानी यांची कायदेशीर टीम कोणत्याही शिक्षेविरोधात अपील करू शकते, ज्यामुळे कायदेशीर लढाई लांबण्याची शक्यता असते.
अदानी समूहाने हे आरोप फेटाळून लावले असून ते निराधार असल्याचे म्हटले आहे. ते कायद्याचे व नियमांचे पालन करून व्यवसाय करतात असा दावा कंपनीने दिलेल्या निवेदनात करण्यात आल आहे.