आसाममधील उदलगुरी जिल्ह्यात हैदराबाद येथील बलात्कार प्रकरणाची पुनरावृत्ती झाली असून सामूहिक बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका आरोपीचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. सोमवारी रात्री ही चकमक झाली आहे.
२०१९ मध्ये हैदराबादमधील गच्चीबाऊली येथे प्रियंका रेड्डी या तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिला जिंवत जाळून मारले होते. या प्रकरणातील ४ आरोपींचा पोलिसांनी एन्काउंटर केला होता.
२२ जून रोजी उदलगुरी जिल्ह्यातील मजबत भागात एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी होफिजुल अली या तरुणाला त्याच्या चार साथीदारासह सोमवारी सकाळी अटक केली होती.
पोलिसी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री तपासादरम्यान होफिजुल अली याने अधिकाऱ्यांवर हल्ला करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. अनेक गोळ्या लागल्याने त्याला गंभीर अवस्थेत तेजपूर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर अतिसुरक्षित वॉर्डात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी सांगितले की, १७ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली सोमवारी सकाळी २२ ते ३० वयोगटातील पाच तरुणांना अटक केली होती. मुलीच्या कुटुंबियांनी रविवारी तक्रार दाखल केल्यानंतर याबाबत गुन्हा नोंद केला होता.
पोलिसांनी होफिजुल अलीसह मुश्ताक अहमद, मोहिदुल इस्लाम, सद्दाम अली आणि एहसान अहमद यांना लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा, २०१२ आणि भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) इतर काही कलमान्वये अटक केली आहे. सर्व आरोपी २२ ते ३० वयोगटातील असून हे सर्व जण स्थानिक रहिवासी आहेत. मात्र, ते मुलीच्या ओळखीचे नव्हते.
मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे आणि ती बरी झाल्यानंतर तिचा जबाब नोंदविला जाईल. तिच्यावर काही उपचार सुरू असून स्थानिक प्रशासनाचे अधिकारी यावर लक्ष ठेवून आहेत. सामूहिक बलात्काराच्या निषेधार्थ पीडितेच्या कुटुंबियांसह स्थानिकांनी सोमवारी निदर्शने केली आणि एका आरोपीचे घर जाळण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून आरोपींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन आंदोलकांना दिले.
लोकांनी आरोपींच्या फाशीची मागणी केली आहे. आपण मुलींच्या शिक्षणाबद्दल बोलतो पण मुली बाहेर पडल्यावर त्यांना अत्याचार सहन करावा लागतो. आरोपींना कठोर शिक्षा देऊन पोलिस आणि न्यायव्यवस्थेने आदर्श घालून द्यावा,' असे मत स्थानिकांनी व्यक्त केले.