Gaganyaan Mission Astronauts : भारताची महत्वाकांशी गगनयान मोहिमेसाठी निवडण्यात आलेल्या चार अंतराळवीरांची नावे इस्रोने जाहीर केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची आज केरळमधील तिरुअनंतपुरम येथील विक्रम साराभाई अंतराळ केंद्रात त्यांची भेट घेतली. इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांनी त्यांची ओळख करून दिली. अंतराळात जाण्यासाठी भारतीय हवाई दलातील या वीरांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अनेक उमेदवारांची तपासणी करून अंतिम चार वैमानिकांना या साठी निवडण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदींनी या अंतराळवीरांना आज मंचावर बोलावून त्यांची ओळख जगाला करून दिली. गगनयानातून अंतराळात जाण्याच्या तयारीत असलेल्या अंतराळवीरांची नावे ग्रुप कॅप्टन प्रशांत बाळकृष्ण नायर, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप आणि विंग कमांडर शुभांशू शुक्ला अशी आहेत. हवाई दलातील या शूर जवानांना सर्व प्रकारच्या लढाऊ विमानांची माहिती आणि उड्डाणाचा मोठा अनुभव असल्याचे बोलले जात आहे.
गगनयान प्रकल्पांतर्गत इस्रोया अंतराळ वीरांना पृथ्वीच्या ४०० किमीच्या कक्षेत पाठवण्याच्या तयारीत आहे. या मोहिमेद्वारे अंतराळवीर तीन दिवस पृथ्वीच्या कक्षेत राहणार आहेत. यानंतर त्यांना पृथ्वीवर सुरक्षितपणे आणण्यात येणार आहेत. दरम्यान, या मोहिमेतील पहिले मानवरहित मिशन म्हणजेच G1 हे या वर्षी २०२४ च्या शेवटच्या टप्प्यात पाठवले जाऊ शकते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गगनयान मोहिमेत सहभागी होणाऱ्या अनेक वैमानिकांची चाचणी घेण्यात आली होती. यातून केवळ वैमानिकांनी निवडीचा पहिला टप्पा पार केला. ही चाचणी २०१९ मध्ये भारतीय वायुसेनेच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या एअरोस्पेस मेडिसिन संस्थेत म्हणजेच IAF बेंगळुरू येथे आयोजित करण्यात आली होती. निवड प्रक्रियेच्या अनेक फेऱ्यांनंतर आयएएमने वरील चौघांची या मोहिमेसाठी निवड केली.
२०२० मध्ये चार जणांना इस्रोने सुरुवातीच्या प्रशिक्षणासाठी रशियाला पाठवले होते. हे प्रशिक्षण २०२१ मध्ये संपले. कोविड-19 मुळे प्रशिक्षण पूर्ण होण्यास वेळ लागल्याचे बोलले जात आहे.