मोठ्या राजकीय उलथापालथीचा सामना करत असलेल्या फ्रान्सच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ३४ वर्षीय गॅब्रियल अटल यांच्याकडे पंतप्रधान पदाची धुरा सोपवली आहे. त्यानंतर गॅब्रियल फ्रान्सच्या इतिहासातील सर्वात तरुण व पहिले समलिंगी पंतप्रधान बनले आहेत. त्यांनी ६२ वर्षीय एलिजाबेथ बोर्न यांच्या राजीनाम्यानंतर त्यांची जागा घेतली आहे. यूरोपीय युनियनच्या निवडणुकीपूर्वी आपल्या टीममध्ये बदल करत असलेल्या इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधानपदी गॅब्रियलची नियुक्ती केली. युरोपियन युनियनची निवडणूक यावर्षीच्या शेवटी होणार आहे.
२०२३ मध्ये पेन्शन आणि इमिग्रेशन सुधारणांमुळे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यापुढील आव्हान वाढले होते. तसंच, राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन यांच्याशी झालेल्या मतभेदामुळे माजी पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांनी पंतप्रधान पदाचा सोमवारी राजीनामा दिला.
गॅब्रियल यांनी आपल्यापेक्षा जवळपास वयाने दुप्पट असलेल्या माजी पंतप्रधान एलिजाबेथ बोर्न यांची जागा घेतली आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर अटलची नियुक्ती निश्चित मानली जात होती. एलिजाबेथ बोर्न यांच्या राजीनाम्याचे कारण नव्या इमिग्रेशन कायद्यावरून निर्माण झालेला राजकीय वाद मानले जात आहे. मॅक्रॉन यांनी या कायद्यांचे समर्थन केले होते. त्यांनी सोमवारी बोर्न यांचा राजीनामा मंजूर केला होता व मंगळवारी नव्या पंतप्रधानांची घोषणा केली.६२ वर्षीय एलिजाबेथ बोर्न यांना मे २०२२ मध्ये पंतप्रधान नियुक्त केले होते. त्या जवळपास दोन वर्षे या पदावर होत्या. फ्रॉन्सच्या पंतप्रधान पदावर पोहोचलेल्या त्या दुसऱ्या महिला होत्या.
फ्रान्सच्या सर्वात तरुण पंतप्रधान ग्रॅब्रियल यांचा जन्म मार्च १९८९ मध्ये झाला होता. त्यांचे वडील यहूदी असून आईचे पूर्वज ग्रीक-रशियन होते. अटल समलिंगी आहेत. वयाच्या ३४ व्या वर्षीही त्यांचं देशातील राजकारणात चांगलं योगदान आहे. ते १७ वर्षांचे असताना समाजवादी पक्षात सामील झाले. २०२३ मध्ये शिक्षण मंत्री बनण्यापूर्वी ते अर्थशास्त्र आणि वित्त मंत्रालयात मंत्री होते. फ्रान्सचे नवे व सर्वात तरुण पंतप्रधान गॅब्रियल आतापर्यंत देशाचे सर्वात तरुण शिक्षणमंत्री होते. ते मॅक्रॉन यांच्या जवळचे समजले जातात.