vijay mallya son wedding : भारतीय बँकांची हजारो कोटी रुपयांची फसवणूक करून पळून गेलेला मद्यसम्राट विजय मल्ल्याचा मुलगा सिद्धार्थने लंडनमध्ये लग्न केले. सिद्धार्थचे लग्न गेल्या आठवड्यात झाले. आलीशान झालेल्या या लग्नात अनेक पाहुणे मंडळी आली होती. यात मल्या यांचे काही कौटुंबिक मित्र देखील उपस्थित होते. या लग्न सोहळ्यातील सर्वात चर्चेत असलेली गोष्ट म्हणजे भारतातून आर्थिक फसवणूक प्रकरणी आणखी एक फरार झालेल्या ललित मोदी याने देखील सिद्धार्थ माल्याच्या लग्नात हजेरी लावली.
या लग्नातील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून ज्यामध्ये ललित मोदी या विवाह सोहळ्यात उपस्थित असल्याचे दिसत आहे. हा विवाह सोहळा ब्रिटनच्या हर्टफोर्डशायर भागात झाला. सिद्धार्थ मल्ल्या आणि जस्मिनचे पहिले लग्न ख्रिश्चन धर्मपद्धतीनुसार झाले. यानंतर दोघांनी हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केले.
ललित मोदी भारतातील प्रसिद्ध क्रिकेट लीग आयपीएलचे माजी चेअरमन राहिले आहेत. मोदी यांच्यावर आयपीएलमधील आर्थिक अनियमिततेचा आरोप ठेवण्यात आला आहे. ललित मोदी यांच्यावर भारतीय न्यायालयात टॅक्स फ्रॉड, मनी लाँड्रिंगसारखे खटले सुरू आहेत. याशिवाय सिद्धार्थचे वडील व भारतातील मद्यसम्राट म्हणून ओळख असलेल्या विजय मल्ल्या यांच्यावर देखील बँकांकडून कर्ज घेत फसवणुक केल्याचा आरोप आहे. आयपीएल २०१० च्या हंगामानंतरच ललित मोदीला बीसीसीआयने निलंबित केले होते. त्यांच्यावर आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहाराचे आरोप झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता.
बीसीसीआयने ललित मोदींवर आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष असताना ७५३ कोटी रुपयांच्या घोटाळा केल्याचा आरोप केला होता. वर्ल्ड स्पोर्ट्स ग्रुपच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने ललित मोदी यांनी हा घोटाळा केल्याचे पुढे आले होते. सिद्धार्थ मल्ल्याच्या लग्नाला ललित मोदींव्यतिरिक्त दोन्ही कुटुंबांचे नातेवाईक देखील उपस्थित होते. ख्रिश्चन लग्नात वधू बनलेल्या जस्मिनने पांढरा पोशाख परिधान केला होता.
फरार उद्योगपती विजय मल्ल्या लग्नात आपल्या मुलाचे चुंबन घेताना दिसला. यानंतर हिंदू रितीरिवाजानुसार लग्न झाले, तेव्हा जस्मिनने गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ लग्नात आलेल्या पाहुण्यांनी सोशल मिडियावर शेअर केले आहेत. अशाच एका व्हिडिओमध्ये सिद्धार्थ आणि जास्मिन डान्स करताना दिसत आहेत. यानंतर दोघांनी केकही कापला. दोघांनीही लग्नाचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. काही फोटोंमध्ये विजय मल्ल्या मुलगा सिद्धार्थचे चुंबन घेतांना दिसत आहे.