four celebrities received bharat ratna : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी माजी पंतप्रधान पी. व्ही नरसिंह राव, चौधरी चरण सिंग, कर्पूरी ठाकूर आणि एमएस स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न आज प्रदान केले. माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनाही भारतरत्न देण्यात येणार आहे. मात्र, त्यांची तब्येत आणि वय पाहता, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्वत: रविवारी त्यांना त्यांच्या निवासस्थानी भेटून हा सन्मान प्रदान करणार आहेत.
या वर्षी केंद्राने पाच व्यक्तींना भारतरत्न देण्याची घोषणा केली होती. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर पंडित मदन मोहन मालवीय, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख यांना भारत रत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण ५३ जणांना भारतरत्न देण्यात आला आहे.
३ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली होती. आडवाणी ९६ वर्षांचे असून ते आजारी देखील आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या रविवारी ३१ मार्च रोजी त्यांच्या निवासस्थानी पोहोचून त्यांचा सन्मान करणार आहेत. वाजपेयी आणि नानजी देशमुख यांच्यानंतर, अडवाणी हे भारतरत्न दिले जाणारे तिसरे आरएसएसशी संबंधित नेते आहेत.
पी. व्ही. नरसिंह राव यांच्याबद्दल बोलायचे झाले तर ते देशाचे नववे पंतप्रधान होते. देशाच्या विकासासाठी त्यांनी उदारीकरणाचे धोरण स्वीकारले. त्यांनी भारताची अर्थव्यवस्था संपूर्ण जगासाठी खुली केली. यामुळे देशाचा झपाट्याने विकास झाला. त्यामुळे त्यांना नव्या युगाचे प्रवर्तक मानले जाते. चौधरी चरणसिंग हे पाचवे पंतप्रधान होते. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतल्याने त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. तर बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना जननायक म्हणून ओळखले जाते. ते दोन वेळा बिहारचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होते. त्यांच्या साध्या राहणीमुळे आणि उच्च विचारांमुळे आजही त्यांचे नाव आदराने घेतले जाते.