Manmohan Singh: मनमोहन सिंग यांनी घेतलेले ५ मोठे निर्णय, ज्यासाठी संपूर्ण देश त्यांचा सदैव ऋणी राहील!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Manmohan Singh: मनमोहन सिंग यांनी घेतलेले ५ मोठे निर्णय, ज्यासाठी संपूर्ण देश त्यांचा सदैव ऋणी राहील!

Manmohan Singh: मनमोहन सिंग यांनी घेतलेले ५ मोठे निर्णय, ज्यासाठी संपूर्ण देश त्यांचा सदैव ऋणी राहील!

Dec 27, 2024 12:53 PM IST

Manmohan Singh Dies At 92: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे शिक्षणाचा अधिकार, माहितीचा अधिकार, अन्न सुरक्षा कायदा, भूसंपादन कायदा, वन हक्क कायदा आणि मनरेगा या ऐतिहासिक सुधारणांसाठी स्मरणात राहतील.

देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन
देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन (REUTERS)

Manmohan Singh Passes Away: नव्वदच्या दशकात पी.व्ही. नरसिंह राव सरकारमध्ये देशाच्या आर्थिक उदारीकरणाचे शिल्पकार आणि भारताचे नामवंत राजकारणी मनमोहन सिंह यांचे गुरुवारी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ असलेल्या मनमोहन सिंह यांनी २००४ ते २०१४ अशी सलग दोन वेळा भारताचे पंतप्रधान पद भूषवले आणि देशाच्या कारभारावर आणि अर्थव्यवस्थेवर अमिट ठसा उमटवला. मनमोहन सिंह यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत देशासाठी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. पण असे काही निर्णय आहेत, ज्यासाठी संपूर्ण देश त्यांचा सदैव ऋणी राहील.

मनमोहन सिंह हे त्यांच्या आर्थिक सुधारणावादी विचार आणि कल्याणकारी धोरणांसाठी ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली देशाने अनेक कायदे आणि योजना आमलात आणली, ज्यामुळे लाखो नागरिकांचे जीवन सुधारले. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या काही ऐतिहासिक बदलांबद्दल जाणून घेऊयात.

मनमोहन सिंह यांनी घेतलेले मोठे निर्णय

 

  • माहितीचा अधिकार (२००५)

या कायद्याने प्रत्येक भारतीय नागरिकाला सरकारी माहिती मिळवण्याचा अधिकार दिला, ज्यामुळे पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित झाले.

  • वन हक्क कायदा (२००६)

आदिवासी समाजाला त्यांचे परंपरागत जमिनीचे हक्क परत मिळवून देण्यासाठी हे एक ऐतिहासिक पाऊल होते.

  • मनरेगा (२००६)

मनमोहन सिंह यांच्या सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा लागू केला, ज्याने प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला एका वर्षात १०० दिवसांच्या रोजगाराचा अधिकार दिला.

  • शिक्षण हक्क कायदा (२००९)

सिंग यांच्या सरकारने ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार दिला. हा कायदा मुलांना त्यांचे मूलभूत हक्क मिळवून देण्याच्या दिशेने मैलाचा दगड ठरला.

  • राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (२०१३)

या कायद्याद्वारे देशातील दोन तृतीयांश कुटुंबांना परवडणाऱ्या दरात खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यात आले. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांसाठी हे पाऊल वरदान ठरले.

  • भूसंपादन कायदा (२०१३)

विकास प्रकल्पांसाठी भूसंपादन करताना बाधित लोकांना योग्य मोबदला देण्यात यावा, यासाठी हा कायदा तयार करण्यात आला.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी शोकाकूळ

मनमोहन सिंह यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. एक्स वरील पोस्टमध्ये नरेंद्र मोदी म्हणाले की, 'मनमोहन सिंह पंतप्रधान होते आणि मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो, तेव्हा मी आणि मनमोहन सिंह नियमित पणे संवाद साधत होतो. प्रशासनाशी संबंधित विविध विषयांवर आम्ही व्यापक चर्चा करायचो. त्यांचे शहाणपण आणि नम्रता नेहमीच दिसून येत असे. या दु:खाच्या क्षणी माझ्या संवेदना डॉ. मनमोहन सिंग यांचे कुटुंबीय, त्यांचे मित्र आणि असंख्य चाहत्यांसोबत आहेत.'

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर