Manmohan Singh: मोठी बातमी! देशाचे माजी पंतप्रधान आणि प्रख्यात अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग यांचे निधन
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Manmohan Singh: मोठी बातमी! देशाचे माजी पंतप्रधान आणि प्रख्यात अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग यांचे निधन

Manmohan Singh: मोठी बातमी! देशाचे माजी पंतप्रधान आणि प्रख्यात अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग यांचे निधन

Dec 27, 2024 12:52 PM IST

Manmohan Singh Passes Away: देशाचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले.

माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांचे निधन
माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांचे निधन (PTI)

Manmohan Singh Death: माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे गुरुवारी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. प्रकृती खालावल्याने गुरुवारी संध्याकाळी त्यांना गंभीर अवस्थेत दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. मनमोहन सिंह हे त्यांच्या साधेपणा, प्रामाणिकपणा आणि उत्कृष्ट आर्थिक धोरणांसाठी ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने भारतीय राजकारण आणि अर्थव्यवस्थेची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मनमोहन सिंह यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी अखंड भारतातील पंजाब प्रांतातील गाह गावात झाला. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात स्थायिक झाले. तो लहानपणापासून हुशार विद्यार्थी होते. पंजाब विद्यापीठातून पदवी चे शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी केंब्रिज व ऑक्सफर्ड विद्यापीठात गेले.

मनमोहन सिंह यांनी १९५० च्या दशकात आर्थिक घडामोडींचे संशोधक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांच्या उल्लेखनीय योगदानामुळे १९७१ मध्ये त्यांची भारत सरकारच्या आर्थिक सल्लागार पदावर नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणूनही काम पाहिले.

१९९१ मध्ये भारत गंभीर आर्थिक संकटातून जात असताना डॉ. मनमोहन सिंह यांची अर्थमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली. भारताला आर्थिक उदारीकरणाच्या मार्गावर नेणाऱ्या ऐतिहासिक आर्थिक सुधारणा त्यांनी घडवून आणल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली अर्थव्यवस्थेच्या अनेक क्षेत्रात परकीय गुंतवणुकीची दारे खुली झाली आणि आर्थिक विकासाला गती मिळाली.

मनमोहन सिंह २००४ ते २०१४ या दोन वेळा भारताचे पंतप्रधान होते. लोकसभेची निवडणूक न जिंकणारे आणि राज्यसभेचे सदस्य असताना हे पद भूषविणारे ते पहिले पंतप्रधान होते. त्यांच्या कार्यकाळात आर्थिक विकास आणि सामाजिक नियोजनावर विशेष भर देण्यात आला.

डॉ. मनमोहन सिंग हे साधे जीवन जगणारे नेते होते. त्यांच्या पश्चात पत्नी गुरशरण कौर आणि तीन मुली असा परिवार आहे. साहित्य, संगीत आणि अध्यात्मात त्यांना प्रचंड रस होता. मनमोहन सिंह यांच्या निधनाचे वृत्त समजताच देशभरात शोककळा पसरली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर