Manmohan Singh: माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल, प्रकृती चिंताजनक!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Manmohan Singh: माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल, प्रकृती चिंताजनक!

Manmohan Singh: माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल, प्रकृती चिंताजनक!

Dec 26, 2024 10:20 PM IST

Manmohan Singh Hospitalised: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांची प्रकृती खालावली असून त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांची प्रकृती खालावली
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांची प्रकृती खालावली (PTI)

Manmohan Singh Admitted to AIIMS Hospital: माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंह यांची तब्येत बिघडल्याने त्यांना आज रात्री आठ वाजता दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत दाखल करण्यात आले. सध्या ते ९२ वर्षांचे असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचे कारण समजू शकलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, पण त्यांची प्रकृती चिंतजनक आहे. त्यांच्यावर रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात उपचार सुरू आहेत. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत.

दरम्यान, काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वाड्रा रात्री पावणेदहाच्या सुमारास त्यांची प्रकृती पाहण्यासाठी दिल्लीतील एम्समध्ये पोहोचल्या. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी 'माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे.

डॉ.मनमोहन सिंग यांनी २००४ ते २०१४ अशी १० वर्षे पंतप्रधानपद भूषविताना देशाची सूत्रे सांभाळली. ते ३३ वर्षे राज्यसभेचे सदस्य होते आणि यावर्षी एप्रिलमध्ये राज्यसभेतून निवृत्त झाले. १९९८ ते २००४ या काळात ते राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेही होते.

तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सिंह यांनी जून १९९१ मध्ये अर्थमंत्री पदाची शपथ घेतली आणि चार महिन्यांनंतर त्यांनी पहिल्यांदा राज्यसभेत प्रवेश केला. तेव्हापासून ते सातत्याने या सभागृहाचा भाग आहेत. या दरम्यान त्यांनी राज्यसभेत पाच वेळा आसामचे प्रतिनिधित्व केले आणि त्यानंतर २०१९ मध्ये ते राजस्थानला गेले. आपल्या राजकीय कारकिर्दीत १९९९ मध्ये त्यांनी दक्षिण दिल्ली मतदारसंघातून एकदाच लोकसभेची निवडणूक लढवली, मात्र त्यांना यश मिळू शकले नाही.

मनमोहन सिंह यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी अखंड भारतातील पंजाब प्रांतातील एका खेड्यात झाला. डॉ. सिंह यांनी १९४८ साली पंजाब विद्यापीठातून मॅट्रिकचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी ब्रिटनच्या केंब्रिज विद्यापीठातून पुढील शिक्षण घेतले. १९५७ मध्ये त्यांनी अर्थशास्त्रात प्रथम श्रेणी ऑनर्स पदवी मिळवली. १९६२ मध्ये त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या न्यूफिल्ड कॉलेजमधून अर्थशास्त्रात डी.फिल केले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर