सध्या जेलमध्ये कैद असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कुलपती पदासाठी अर्ज भरला आहे. इम्रान खान यांच्या मार्फत ‘तहरिक-ए-इन्साफ’ पक्षाचे ब्रिटनस्थित प्रवक्ते सैय्यद झुल्फिकार बुखारी यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाकडे हा अर्ज सादर केला असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. ‘पाकिस्तानचे माजी पंतप्रधान, पाकिस्तानातील सर्वात मोठा राजकीय पक्ष 'तहरिक ए इन्साफ'चे राष्ट्रीय अध्यक्ष, अष्टपैलू क्रिकेटपटू राहिलेले इम्रान खान हे सध्या जेलमध्ये कैद असून जेलमधूनच ते ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कुलपतीपदाची निवडणूक लढवणार आहे.' असं तहरिक ए इन्साफच्या सोशल मीडियावरून पोस्ट करण्यात आले आहे.
इम्रान खान यांना गेले वर्षभर बेकायदेशीर जेलमध्ये डांबून ठेवण्यात आलं आहे. खान यांनी त्यांच्या तत्वांशी तडजोड केलेली नसल्याने त्यांना जेलमध्ये डांबण्यात आल्याचं प्रवक्त्यानं म्हटलं आहे.
ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कुलपती पदाचा कार्यकाळ १० वर्षांचा असतो. विद्यमान कुलपती क्रिस पॅटन यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे फेब्रुवारी २०२४ महिन्यात जाहीर केले होते. दरम्यान, या पदासाठी ऑक्टोबर २०२४ महिन्यात निवडणूक होणार आहे. या पदासाठी किती अर्ज आले आहेत हे विद्यापीठ प्रशासनाने अद्याप जाहीर केलेले नाही.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. खान यांनी १९७५ साली ऑक्सफर्ड विद्यापीठातून तत्वज्ञान, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषयात पदवी संपादन केली होती. ऑक्सफर्डमधून शिक्षण घेतल्यानंतर इम्रान खान यांनी पाकिस्तानात क्रिकेटमध्ये यशस्वी करिअर केले होते. पाकिस्तान क्रिकेट संघाचे कर्णधार असताना त्यांच्या नेतृत्वाखाली पाक संघाने विश्वचषक जिंकला होता.
क्रिकेटपटू असतानाच्या काळात इम्रान खान यांची प्लेबॉय म्हणून प्रतिमा होती. ब्रिटन, पाकिस्तान आणि भारतातील अनेक सिनेतारका तसेच उद्योजक घराण्यातील तरुणींशी त्यांचे नाव जोडले गेले होते. इम्रान खान यांनी एकूण तीन लग्न झाली आहेत. खान यांची पहिली पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ (१९९५-२००४) ही प्रसिद्ध ब्रिटिश उद्योगपती जेम्स गोल्डस्मिथ यांची मुलगी होती. त्यानंतर इम्रान खान यांनी ब्रिटिश नागरिक असलेली टीव्ही पत्रकार रेहम खान हिच्याशी २०१५ साली लग्न केलं. परंतु हे लग्न काही महिनेच टिकू शकलं. त्यानंतर इम्रान खान यांनी बुश्रा बिबी या घटस्फोटित महिलेशी जानेवारी २०१८ मध्ये विवाह केला होता.
ब्रिटनमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठात कुलपती हे एक मानाचं पद असून या पदावरूल व्यक्ती हा विद्यापीठाचा प्रमुख असतो. कुलपतींना अनेक समारंभांत अध्यक्षपद भूषवावे लागलेत. इम्रान खान हे यापूर्वी २००५ ते २०१४ या दरम्यान ब्रिटनच्या ब्रॅडफोर्ड विद्यापीठाचे कुलपती होते.