Imran Khan Sentence news : पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात ऑफिशिल सीक्रेट अॅक्टचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पाकच्या विशेष न्यायालयानं १० वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. त्यामुळं इम्रान खान यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आल्याचं बोललं जात आहे.
पाकिस्तानच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अबुल हसनत मोहम्मद जुल्कारनैन यांनी मंगळवारी हा आदेश दिला. इम्रान खान यांचे वकील शोएब शाहीन यांनी स्वत: याबाबतची माहिती दिली. इम्रान यांच्या बरोबरच पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी (Shah Mahmood Qureshi) यांनाही १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांच्यावरही गोपनीयतेचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
अमेरिकेतील पाकिस्तानी राजदूतांनी सरकारला पाठवलेल्या गोपनीय संदेशातील मजकूर इम्रान खान यांनी शेअर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याची मुभा आरोपींना देण्यात आली आहे. इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) नं या निर्णयाला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. हे बनावट प्रकरण असल्याचं इम्रान यांच्या पक्षाचं म्हणणं आहे.
देश वाचवण्यासाठी आणि आमच्या स्वातंत्र्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या इम्रान खान व शाह मेहमूद कुरेशी यांच्या पाठीशी संपूर्ण पाकिस्तान उभा आहे. कुठलाही खोटा खटला मार्च-एप्रिल २०२२ रोजी जे घडलं ते बदलू शकत नाही, असं इम्रान यांच्या पक्षानं म्हटलं आहे. आमचा कॅप्टन आणि व्हाइस कॅप्टन लवकरच परत येईल. उच्च न्यायालयात हा निर्णय अजिबात टिकणार नाही, असं विश्वास पीटीआयनं व्यक्त केला आहे.
इम्रान खान यांना शिक्षा सुनावल्यानंतर त्यांच्या पक्ष 'पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ' (पीटीआय) वर बंदी घातली जाऊ शकते, अशी चर्चा पाकिस्तानी मीडियात आहे. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाला 'बेहिशबी निधी' मिळाल्याचं पाकिस्तानच्या निवडणूक आयोगानं (ECP) मागील वर्षी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर विरोधकांनी संधी साधत इम्रान खान यांची कोंडी केली होती. त्यांचं संसद सदस्यत्व रद्द करण्यात आल्याची चर्चा आहे.