पाकिस्तानच्या राजकारणात मोठी खळबळ माजली असून आज माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. इस्लामाबाद हायकोर्टाच्या बाहेरच पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना ताब्यात घेतले. इम्रान खान आज जामीन मिळवण्यासाठी हायकोर्टात गेले होते. इम्रान खान गेल्या अनेक दिवसांपासून लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात विधाने करत आहेत.
इम्रान खान यांचे वकील फैसल चौधरी यांनी त्यांच्या अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. इम्रान खान यांच्या पक्षाचे नेते मसर्रत चौधरी यांनी म्हटले की, माझ्या समोरच इम्रान खान यांना टॉर्चर केले गेले, मला भीती वाटते की, त्यांना ठार मारले जाऊ शकते.
माजी पंतप्रधानइम्रान खान यांच्या अटकेनंतर इस्लामाबाद पोलिसांनीही एक निवेदन जारी केले आहे. इस्लामाबादचे महानिरीक्षक (IG) यांनी सांगितले की, इम्रान यांना कादिर ट्रस्ट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. सध्या परिस्थितीनियंत्रणात आहे. शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. कोणीही नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.
त्याचवेळी, पीटीआयच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्विटमध्ये, उच्च न्यायालयाबाहेर अटकेदरम्यान झालेल्या हाणामारीत इम्रानचे वकील गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे.