Haryana Former CM Death : तब्बल पाच वेळा हरयाणाचं मुख्यमंत्रीपद भूषवणारे दिग्गज नेते आणि इंडियन नॅशनल लोकदलाचे (INLD) प्रमुख ओम प्रकाश चौटाला यांचं शुक्रवारी निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते.
पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. चौटाला हे गेल्या काही दिवसांपासून न्यूमोनियानं आजारी होते. त्यांच्यावर उपचारही सुरू होते. दोनच दिवसांपूर्वी मेदांता रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. शुक्रवारी सकाळी त्यांची प्रकृती खालावल्यानं पुन्हा त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. तिथं त्यांची तब्येत अधिकच खालावली. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र त्यांना यश आलं नाही. उपचार सुरू असतानाच चौटाला यांनी अखेरचा श्वास घेतला. शनिवारी सायंकाळी तेजाखेडा गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौटाला यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ‘चौटाला हे अनेक वर्षे राज्याच्या राजकारणात सक्रिय होते आणि देवीलाल यांचं कार्य पुढं नेण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले,’ असं पंतप्रधानांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. देशातील इतर नेत्यांनीही चौटाला यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
ओमप्रकाश चौटाला यांनी १९६८ मध्ये राजकारणाला सुरुवात केली. १९८९ मध्ये ते पहिल्यांदा हरियाणाचे मुख्यमंत्री झाले, पण त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला. १९९९ मध्ये ते चौथ्यांदा आणि २००० मध्ये पाचव्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यांच्या सरकारनं शिक्षण आणि विकासाच्या क्षेत्रात अनेक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना आणि त्यांचे चिरंजीव अजय चौटाला यांना शिक्षक भरती घोटाळ्यात तुरुंगात जावं लागलं. ओमप्रकाश चौटाला आणि स्नेहलता यांना दोन मुले होती. चौटाला घराण्याची पुढची पिढीही राजकारणात सक्रिय आहे.
ओमप्रकाश यांचा मोठा मुलगा अजय चौटाला आणि धाकटा मुलगा अभय चौटाला हे सध्या कुटुंबाचा राजकीय वारसा पुढं नेत आहेत. २०१८ मध्ये दुष्यंत चौटाला आणि अभय चौटाला यांच्यातील मतभेद वाढले आणि कुटुंबात वाद निर्माण झाला. यानंतर अजय चौटाला यांनी आपल्या मुलांसह जननायक जनता पार्टीची स्थापना केली. तर, अभय चौटाला हे सध्या मूळ पक्ष इंडियन नॅशनल लोकदलचं नेतृत्व करत आहेत.
संबंधित बातम्या