प्रयागराज महाकुंभात किन्नर आखाड्याने मोठी कारवाई केली आहे. किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी ममता कुलकर्णी यांना महामंडलेश्वर पदावरून हटवले आहे. डोके न मुंडवल्याने कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. अजय दास यांनी स्वत:ला किन्नर आखाड्याचे संस्थापक असल्याचे सांगितले. त्यांनी आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांचीही हकालपट्टी केली.
देशद्रोहाच्या आरोपी ममता कुलकर्णी यांना आखाड्यात सामावून घेऊन त्यांच्या नकळत महामंडलेश्वर बनवल्याबद्दल त्यांनी महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांची किन्नर आखाड्यातून हकालपट्टी केली आहे. दुसरीकडे लक्ष्मी स्वत:ला संस्थापक म्हणवून घेत आहे. लक्ष्मी म्हणाली की, अजयला २०१७ मध्ये आखाड्यातून काढून टाकण्यात आले होते. अभिनेत्री ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर बनवल्यानंतर हा वाद वाढला आहे.
अजय दास म्हणाले की, ‘कोणत्याही धार्मिक आणि आखाडा परंपरेचे पालन न करता वैराग्याच्या दिशेऐवजी थेट महामंडलेश्वराच्या उपाधी आणि पट्ट्याचा अभिषेक केला. देशहितासाठी आणि समाजाच्या हितासाठी त्यांना पदावरून मुक्त करणे मला भाग पडले आहे. किन्नर आखाड्याचे सर्व प्रतीकचिन्हही विटंबना करण्यात आले आहे. हे लोक ना जुना आखाड्याची तत्त्वे पाळत आहेत ना किन्नर आखाड्याची तत्त्वे’, असेही ते म्हणाले.
‘किन्नर आखाड्याच्या निर्मितीबरोबर गळ्याभोवती वैजंती हार घातली गेली, जी श्रृंगाराचे प्रतीक आहे, परंतु, तिने ती काढून रुद्राक्षाची माळ परिधान केली. जे त्याग आणि संन्यासाचे प्रतीक आहे ते मुंडन समारंभाशिवाय वैध नाही. अशा प्रकारे ते सनातन धर्मप्रेमी आणि समाजाची फसवणूक करीत आहेत. त्यामुळे आज मला ही सर्व माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनहितार्थ आणि धर्महितासाठी देणे गरजेचे होते’, असे अजय दास म्हणाले.
ममता कुलकर्णी हिला किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर बनवल्यानंतर हा वाद सुरू झाला. यादरम्यान अनेक प्रकारचे प्रश्न विचारले जात होते. अभिनेत्री ममता कुलकर्णी काही दिवसांपूर्वी महामंडलेश्वर बनली. महाकुंभातील संगमस्नान आणि पिंडदानानंतर किन्नर आखाड्याचे आचार्य डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनीही पटाभिषेक करताना ममतांना नवे नाव दिले. त्यानंतरही महाकुंभ असल्याने वाद सुरूच होता.
आचार्य लक्ष्मी नारायण यांनी यावेळी सांगितले होते की, ‘ममता सुमारे दीड वर्षांपासून आमच्या संपर्कात होती. याआधीही ती जुना आखाड्यात महामंडलेश्वरसोबत होती. गुरू ब्रह्मलिन झाल्यानंतर तिला दिशा मिळत नव्हती. यावेळी त्यांनी सनातनशी पूर्णपणे जोडले जाण्याची इच्छा व्यक्त केली. ती आली आणि म्हणाली की मला काही पद हवे आहे, मला महामंडलेश्वर व्हायचे आहे. ममतांना वृंदावनमधील आश्रमाचा अधिक प्रचार करायचा आहे. त्यावर आम्ही ममतासमोर काही अटी ठेवल्या. त्या तिने मान्य केल्या.'
संबंधित बातम्या