karpuri thakur : केंद्र सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारत रत्न देण्याची घोषणा केली आहे. याबाबत राष्ट्रपती कार्यालयाने अधिकृत निवेदन जारी केले आहे. कर्पूरी ठाकूर यांची बुधवारी साजरी होणाऱ्या १०० व्या जन्म जयंतीच्या पूर्वसंख्येला त्यांना मरणोत्तर भारत रत्न पुरस्काराने सम्मानित करण्यात आले आहे.
जनता दल यूनायटेड (जेडीयू) ने कर्पूरी ठाकूर यांना भारत रत्न देण्याची मागणी केली होती. याची घोषणा केल्यानंतर जेडीयूने मोदी सरकारचे आभार मानले आहेत.
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर कर्पुरी ठाकूर यांचा मुलगा रामनाथ ठाकूर यांनी सांगितले की, ३६ वर्षांच्या तपश्चर्येचे अखेर फळ मिळाले आहे. यासाठी बिहारच्या १५ कोटी जनतेच्या वतीने केंद्र सरकारचे आभार.
कोण होते कर्पुरी ठाकूर?
बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांचा जन्म २४ जानेवारी १९२४ रोजी झाला होता. बिहारचे जननायक म्हणून कर्पुरी ठाकूर यांना संबोधले जात होती. त्याचबरोबर स्वातंत्र्यसैनिक, शिक्षक आणि ज्येष्ठ समाजवादी राजकारणी अशीही त्यांची ओळख आहे. कर्पुरी ठाकूर १९७० च्या दशकात दोनदा बिहारचेमुख्यमंत्री राहिले आहेत. त्याचबरोबर ते उपमुख्यमंत्रीपदावरही राहिले आहेत. त्याच्या काळात मागासवर्गीयांना २७ टक्के आरक्षण दिले होते. लोकनायक जयप्रकाश नारायण आणि राम मनोहर लोहिया हे त्यांचे राजकीय गुरू होते.
१९५२ मध्ये ते पहिल्यांदा आमदार बनले त्यानंतर ते एकाही निवडणुकीत पराभूत झाले नव्हते. बिहारच्या राजकारणातील प्रभावी नेते मानले जाणारे लालूप्रसाद यादव, नितीश कुमार, सुशील कुमार मोदी हे त्यांचे शिष्य आणि राजकीय राजकीय वारसदार मानले जातात.
१९६७ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत युनायटेड सोशलिस्ट पार्टीने कर्पुरी ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मोठा विजय मिळवला व बिहारमध्ये पहिल्यांदाच बिगर काँग्रेसी सरकार सत्तेवर आले.
संबंधित बातम्या