West Indies Australia Tour: ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात स्टीव्ह स्मिथला नवी भूमिका मिळाली. डेव्हिड वॉर्नरच्या कसोटी निवृत्तीनंतर स्मिथकडे सलामीची जबाबदारी देण्यात आली. वॉर्नरने अलीकडेच पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळली. त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापनाने डेव्हिड वॉर्नरच्या जागी स्मिथ सलामीवीर म्हणून खेळणार असल्याचे जाहीर केले. मात्र, यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार किम ह्युजने धक्कादायक वक्तव्य केले. स्मिथ सलामीला फलंदाजी करण्यासाठी येणार असल्याचे समजताच मला उलट्या होणार होत्या, असे ह्युजने म्हणाला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराचे वक्तव्य चर्चेत आले. उत्कृष्ट फॉर्मात असलेल्या वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून बॅनक्रॉफ्टला संधी का देण्यात आली नाही? असा प्रश्न किम ह्युजने उपस्थित केला होता. स्मिथ वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतून सलामीची जबाबदारी सांभाळणार आहे.
डब्ल्यूए स्पोर्ट्स टॉकशी बोलताना किम ह्युज सांगितले की, "स्मिथ फलंदाजी करण्यासाठी येणार असल्याचे समजताच मला उलट्या होणार होत्या. कॅमेरून बॅनक्रॉफ्ट जर न्यू साउथ वेल्सकडून खेळला तर, तो कसोटी संघात असेल यात शंका नाही." स्मिथच्या फॉर्मबद्दल बोलताना किम ह्युज म्हणाला की, "स्मिथ हा चांगला फलंदाज आहे, मात्र, आता तो खेळपट्टीवर संघर्ष करत आहे. त्याला चौथ्या क्रमांकावरच फलंदाजी करायला हवी."
ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या जाणार्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला उद्यापासून (१७ जानेवारी) सुरुवात होणार आहे. त्यातील पहिला सामना अॅडलेडमध्ये खेळवला जाईल. यानंतर दुसरी कसोटी सामना येत्या २५ जानेवारीपासून ब्रिस्बेनमध्ये खेळवला जाणार आहे. या मालिकेत स्मिथ सलामीला फलंदाजी करताना दिसणार आहे.
पहिला कसोटी सामना- १७ जानेवारी २०२३ (अॅडलेड)
दुसरा कसोटी सामना- २५ जानेवारी २०२३ (ब्रिस्बेन)