indian students died in foreign countries : भारतीय मुलांचे परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक मुले ही परदेशात जाऊन शिक्षण घेऊन करियरच्या चांगल्या संधि निवडत आहे. पालक देखील मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी त्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी पाठवण्यावर भर देत असतात. मात्र, पालकांची आणि भारतीय मुलांची चिंता वाढवणारी एक बातमी पुढे आली आहे. परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला लेखी उत्तर दिले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या पाच वर्षात परदेशात गेलेल्या तब्बल ४०३ भारतीय विद्यार्थ्यांचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला आहे. यात अपघात, गुन्हेगारीमुळे, नैसर्गिक मृत्यू, आदि कारणांमुळे हे मृत्यू झाल्याचे मुरलीधरन यांनी सांगितले. यात सर्वाधिक मृत्यू हे कॅनडात झाल्याचेही ते म्हणाले.
केंद्रीय गृह राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, गेल्या पाच वर्षांत किमान ४०३ भारतीय विद्यार्थ्यांचा परदेशात विविध कारणांमुळे मृत्यू झाला आहे. या संदर्भात माहिती देतांना व्ही. मुरलीधरण म्हणाले. २०१८ पासून कॅनडामध्ये सर्वाधिक भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणी ९१ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूची कारणे वेगळी आहेत. आपत्ती आणि वैद्यकीय कारणांमुळे काही मुलांचा मृत्यू झाला आहे. गेल्या एका वर्षात कॅनडात ४८, रशियात ४०, अमेरिकेत ३६, ऑस्ट्रेलियात ३५, युक्रेनमध्ये २१ आणि जर्मनीत २० भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
मुरलीधरन म्हणाले की, परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सरकार प्राधान्य देते. ते म्हणाले की, दूतावास विदेशातील शैक्षणिक संस्था आणि तेथे शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांशीही सरकार कायम संपर्कात असतात. काही दुर्घटना किंवा आपत्ती झाल्यास सरकार त्वरित त्यांच्याशी संपर्क साधत आवश्यक ती मदत देतं. गुन्हा घडल्यास संबंधित देशाचे प्रशासन आणि कायद्यानुसार विद्यार्थ्यांना मदत केली जाते. भारतीय विद्यार्थ्यांना आपत्कालीन वैद्यकीय सेवा किंवा निवासासाठी देखील मदत केली जाते.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी परदेशी भूमीवर भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूबद्दल बोलताना सांगितले की, आता परदेशात शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या गेल्या काही वर्षात वाढली आहे. त्यामुळेच मृतांचा आकडाही वाढलेला आहे. केंद्रीय मंत्री म्हणाले की विदेशातील वरिष्ठ भारतीय अधिकारी देखील विद्यार्थी आणि त्यांच्या संस्थांशी कायम संवाद साधत असतात. याशिवाय भारतीय राजदूत हे तेथील शैक्षणिक संस्थांनाही भेटी देऊन भारतीय मुलांचे प्रश्न सोडवत असतात.
गुन्हेगारी प्रकरणाचा तपास योग्य प्रकारे होतो की नाही तसेच दोषींना शिक्षा करण्यासाठी देखील विद्यार्थ्यांना कायदेशीर मदत दिली जाते. आकडेवारीनुसार, २०१८ पासून ब्रिटनमध्ये ४८, इटली आणि फ्रान्समध्ये ४८ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.