आफ्रिकन देश गिनीमधील सर्वात मोठे शहर एन'जेरेकोर मध्ये लोकांच्या गर्दीने खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या वादानंतर चेंगराचेंगरी झाली. यात लहान मुलांसह अनेक फुटबॉलप्रेमींचा मृत्यू झाला तर शेकडो जखमी झाले आहेत. सरकारकडून ही माहिती देण्यात आली आहे.
आफ्रिकेतील गिनीमधील फुटबॉल सामना हा लोकांसाठी एक काळ ठरला आहे. गिनीतील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर एन'अझरकोर येथे रविवारी फुटबॉल सामन्यादरम्यान चाहत्यांमध्ये हाणामारी झाली. त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात व चेंगराचेंगरीत १०० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. या अपघाताचे कारण मॅच रेफरीचा एक चुकीचा निर्णय असल्याचे बोलले जात आहे. एक निर्णय चाहत्यांना मान्य नव्हता त्यानंतर वाद झाला. रस्त्यावर हिंसाचार उसळल्यानंतर जमावाने एन'अझरकोर पोलिस ठाण्याला आग लावल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
एएफपीने प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने सांगितले की, देशातील रुग्णालयांमध्ये आणीबाणीसदृश वातावरण आहे. एका डॉक्टरने सांगितले की, डोळ्याला दिसेल तितके रुग्णालयात मृतदेह पडलेले आहेत. दालनात लोक जमिनीवर पडून आहेत. शवागार भरले आहे. या अपघाताशी संबंधित अनेक व्हिडिओ इंटरनेटवर शेअर केले जात आहेत. यात सामन्याबाहेरील रस्त्यावर चेंगराचेंगरीच्या दृश्यांचा समावेश आहे. तर अनेक मृतदेह जमिनीवर पडलेले दिसले. नाव न छापण्याच्या अटीवर एका साक्षीदाराने सांगितले की, 'रेफरीच्या वादग्रस्त निर्णयापासून या सगळ्याची सुरुवात झाली. त्यानंतर चाहत्यांनी मैदानावर हल्ला चढवला.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सामना गिनीचे राष्ट्राध्यक्ष मामाडी डौम्बोया यांच्या सन्मानार्थ आयोजित स्पर्धेचा भाग होता, ज्यांनी २०२१ मध्ये बंडखोरी करून सत्ता काबीज केली होती. पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची तयारी डौम्बोया यांनी सुरू केल्याचे समजते आणि अशा स्पर्धा त्यांच्या देशातील संपर्क कार्यक्रमाचा एक भाग आहेत.
सप्टेंबर २०२१ मध्ये राष्ट्राध्यक्ष अल्फा कोंडे यांना पदच्युत करून मामाडी डौम्बोया यांनी बळजबरीने सत्ता काबीज केली होती. आंतरराष्ट्रीय दबावाखाली त्यांनी २०२४ च्या अखेरीस सत्ता परत देण्याचे आश्वासन दिले होते, पण आता त्यांनी तसे करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. घटनात्मक सुव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी २०२५ मध्ये निवडणुका घेण्याचे संकेत अधिकाऱ्यांनी दिले आहेत. माली, बुर्किना फासो आणि नायजर सारख्या आफ्रिकन देशांप्रमाणे डौम्बोयाने लष्करी उठावात सत्ता काबीज केली आहे.
संबंधित बातम्या