हिमाचल प्रदेशातील सिमल्यात पाच मजली इमारत कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेपूर्वी रहिवाशांना बाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. इमारत कोसळल्याची घटना कॅमेऱ्याद कैद झाली आहे. या दुर्घटनेमुळे धामी येथील शासकीय पदवी महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचे प्रचंड नुकसान झाले असून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना मारवाग गावात १६ मैलावर दुपारच्या सुमारास ही घटना घडली, जेथे प्लॉटचे काम सुरू होते. यावेळी अचानक जवळच असलेल्या पाच मजली इमारतीचा काही भाग कोसळला. क्षणार्धात इमारत पत्त्यासारखी कोसळली, हे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीच्या बेस कॉलमला तडे गेले होते. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व रहिवाशांना आधीच बाहेर काढण्यात आले असून इमारतीचे विद्युत कनेक्शन तोडण्यात आले.
धामी येथील शासकीय पदवी महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचे नुकसान झाल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. उपविभागीय दंडाधिकारी (ग्रामीण) निशांत यांनी सांगितले की, वरील डोंगराळ भागात खोदकामामुळे इमारत कोसळली. तसेच कोसळलेल्या इमारतीच्या परिसरात घर बांधण्याच्या तयारीत असलेल्या आणखी एका व्यक्तीचाही त्यांनी उल्लेख केला.