Gujarat university news : गुजरातमधील एका विद्यापीठात पाच परदेशी विद्यार्थ्यांवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे विद्यार्थी उझबेकिस्तान, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. मारहाण झालेले विद्यार्थी अहमदाबादमधील विद्यापीठाच्या वसतिगृहाच्या परिसरात नमाज पठण करत होते. यावेळी काही विद्यार्थ्यांनी त्याच्या नमाज पठणाला विरोध केला, त्यानंतर हे प्रकरण हाणामारी पर्यंत पोहोचले.
परदेशी विद्यार्थ्यांचा दावा आहे की बाहेरून काही लोक अचानक त्यांच्या वसतिगृहाच्या इमारतीत घुसले. त्यांनी जय श्री रामच्या घोषणा देत, विद्यार्थ्यांना वसतिगृहात नमाज पठण करण्याची परवानगी नाही, असे म्हणाले. यावरून दोन गटात वाद झाला आणि या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
ही घटना शनिवारी रात्री ११ च्या सुमारास घडली. एका अफगाण विद्यार्थ्याने दावा केला आहे की, जवळपास १० ते १५ मुले बाहेरून आमच्या वसतिगृहाच्या परिसरात आले. यावेळी आम्ही नमाज अदा करत होतो. त्यातील तिघे आमच्या वसतिगृहाच्या इमारतीत शिरले. त्यांनी आम्हाला सांगितले की आम्ही येथे नमाज अदा करू शकत नाही. यानंतर त्यांनी जय श्री रामच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. काही विद्यार्थ्यांनी तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकाला धक्काबुक्की केली आणि नमाज अदा करणाऱ्या परदेशी मुलांना मारहाण केली. विद्यार्थ्यांनी सांगितले की, त्यांच्या खोल्यांची देखील तोडफोड करण्यात आली. यात लॅपटॉप, मोबाईल फोन आणि आरसेही फोडण्यात आले.
पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत हल्लेखोर पळून गेले होते. परदेशी विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओनुसार, किमान पाच वाहनांचेही नुकसान झाले आहे.
गुजरात विद्यापीठाच्या कुलगुरू नीरजा गुप्ता यांच्याशी या प्रकाराबाबत विचारण्यासाठी संपर्क केला असता, त्यांनी फोनला प्रतिसाद दिला नाही. गुजरात युनिव्हर्सिटी पोलिस ठाण्याचे पीआय एसआर बाचा म्हणाले की ते या प्रकरणाचा तपास करत आहेत. पाच जखमी विद्यार्थ्यांना एसव्हीपी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. या प्रकरणाची माहिती मिळताच गृह राज्यमंत्र्यांनीही चौकशीचे आदेश दिले आहेत.