लडाखमध्ये भारत-चीन दरम्यानच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (Line of Actual Control) असलेल्या न्योमा-चुशूल या भागात दौलत बेग ओल्डी येथे टी-७२ रणगाड्यात बसून नदी ओलांडताना पाच भारतीय लष्करी जवान वाहून गेल्याची दुर्घटना घडली आहे. यात एक ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसरचा (Junior Commissioned Officer)चा समावेश होता. लेहपासून १४८ किमी अंतरावर मंदिर मोड़जवळ ही दुर्घटना घडली आहे.
लष्करी सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी रात्रीच्या वेळी लष्करी सराव सुरू होता. लष्कराची पाच जवानांची एक तुकडी रणगाड्याद्वारे नदी ओलांडत असताना नदीतील पाण्याची पातळी अचानक वाढल्याने ही दुर्घटना घडली. पाचही मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले आहे.
दरम्यान, लडाखमध्ये लष्करी सरावादरम्यान लडाखमध्ये नदीत ५ जवान वाहून गेल्याच्या घटनेवर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. शूर भारतीय जवानांची अनुकरणीय सेवा आम्ही कधीच विसरू शकणार नाही, अशी प्रतिक्रिया राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली आहे. 'शोकाकूल कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. या दु:खाच्या प्रसंगी देश त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे,' अशी प्रतिक्रिया राजनाथ सिंग यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. ‘या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे मी खूप व्यथित झालो आहे. लडाखमध्ये टी-७२ रणगाड्याद्वारे नदी ओलांडताना भारतीय लष्कराच्या ५ शूरवीरांना प्राण गमवावे लागल्याने अत्यंत दु:ख झाले आहे. या दुर्घटनेत बळी पडलेल्या लष्करी जवानांच्या कुटुंबियांप्रती आमची संवेदना आहे. या दु:खाच्या क्षणी देश आपल्या शूर जवानांच्या अनुकरणीय सेवेला सलाम करण्यासाठी एकत्र उभा आहे.’ अशी शोक संवेदना मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केली आहे.
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनीही याप्रसंगी शोक व्यक्त केला आहे. लडाखमधील न्योमा-चुसूल भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ अचानक आलेल्या पुरात पाच सैनिकांसह एक टी-७२ रणगाडा वाहून गेल्याचे ऐकून खूप वाईट वाटले. आपल्या शूर जवानांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो,' असे त्यांनी एक्सवर शेअर केले.