Indian Army Fitness Rules Changes : भारतीय लष्करानं जवानांच्या फिटनेसच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. त्यानुसार लठ्ठ किंवा फिटनेसच्या निकषात न बसणाऱ्या जवानांवर कारवाई करण्यात येणार आहे. नव्या नियमांनुसार, अनफिट जवानांना फिटनेस मिळवण्यासाठी ३० दिवसांचा वेळ दिला जाईल. त्यानंतरही ते फिट न ठरल्यास त्यांच्या सुट्ट्यांना कात्री लावण्यात येणार आहे.
नवीन नियमांनुसार, प्रत्येक कर्मचाऱ्याला यापुढं आर्मी फिजिकल फिटनेस असेसमेंट (APAC) कार्ड देखील तयार ठेवावं लागेल. या संदर्भातील पत्र सर्व कमांडोंना पाठवण्यात आल्याचं वृत्त 'इंडियन एक्स्प्रेस'नं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. आरोग्य तपासणीच्या प्रक्रियेत समानता आणणं, शारीरिक अकार्यक्षमता किंवा लठ्ठपणा आणि जीवनशैलीमुळे होणारे आजार यांचा सामना करणं हा या नव्या नियमांचा उद्देश असल्याचं सांगण्यात आलं.
सध्या बॅटल फिजिकल एफिशिएन्सी टेस्ट (BPET) आणि फिजिकल प्रोफिशियन्सी टेस्ट (PPT) दर तीन महिन्यांनी घेतली जाते. बीपीईटी अंतर्गत, एखाद्या व्यक्तीला ५ किमी धावणे, ६० मीटर धावणे, दोरीवर चढणे आणि निर्धारित वेळेत ९ फूट खड्डा पार करणे आवश्यक आहे. ही वेळ वयाच्या आधारावर ठरवली जाते.
पीपीटीमध्ये २.४ किमी धावणे, ५ मीटर शटल, पुश अप्स, चिन अप्स, सिट अप्स आणि १०० मीटर धावणे यांचा समावेश आहे. याशिवाय काही ठिकाणी जलतरण चाचणीही घेतली जाते. या तपासणीचे परिणाम ACR किंवा वार्षिक गोपनीय अहवालात समाविष्ट केले जातात. याची जबाबदारी कमांडिंग ऑफिसरवर असते.
नवीन नियमांनुसार, ब्रिगेडियर दर्जाच्या अधिकाऱ्यांसह दोन कर्नल आणि एका वैद्यकीय अधिकाऱ्याचं दर तीन महिन्यांनी मूल्यांकन केलं जाईल. बीपीईटी आणि पीपीटी व्यतिरिक्त, सैनिकांना इतर काही चाचण्या द्याव्या लागतील. यामध्ये दर ६ महिन्यांनी १० किमी स्पीड मार्च आणि ३२ किमी रूट मार्चचा समावेश आहे. याशिवाय ५० मीटर जलतरण चाचणीही द्यावी लागणार आहे. सर्व सैनिकांनी आर्मी फिजिकल असेसमेंट कार्ड तयार ठेवून २४ तासांच्या आत चाचणीचे निकाल सादर करावेत.
जे सैनिक फिटनेसचे निकष पूर्ण करू शकणार नाहीत किंवा 'जास्त वजनदार' आढळतील, त्यांना फिटनेस सुधारण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी मिळेल. या कालावधीत त्यांच्यात सुधारणा न झाल्यास सुट्या कापल्या जातील. तसंच, अशा सैनिकांना टीडी सन्मान मिळण्यात अडचणी येऊ शकतात.
संबंधित बातम्या