firing at salman khan house : मुंबईतून एक खळबळजनक घटना पुढे आली आहे. अभिनेता सलमान खान राहत असलेल्या वांद्रे येथील गॅलेक्सी इमारतीबाहेर आज पहाटे ४.५५ च्या सुमारास गोळीबार झाला. दोन अज्ञात हल्लेखोरांनी हा गोळीबार केल्याचे समजते. या घटनेमुळे दहशतीचे वातावरण असून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून हल्लेखोरांचा पोलिस तपास घेत आहे.
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २ हल्लेखोर दुचाकीवरून आले होते. त्यांनी चार राऊंड फायर केल्याचे समजते. पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. आज पहाटे ४.५५ वाजता ही घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. याआधीही सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत.
कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. एका टेलिव्हिजन मुलाखतीत त्याने उघडपणे सांगितले होते की, सलमान खानला मारणे हेच त्याच्या आयुष्याचे उद्दिष्ट आहे. अभिनेता-गायक गिप्पी ग्रेवालच्या कॅनडातील निवासस्थानावरही त्याने हल्ला केला होता आणि सलमान खानसोबतच्या जवळच्या संबंधांमुळे हा हल्ला झाल्याचे म्हटले होते. लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या सुरक्षेचा आढावा घेतला होता.
सलमान खानला सध्या वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. गेल्या वर्षी सलमान खानच्या ऑफिसमध्ये धमकीचा ईमेलही पाठवण्यात आला होता. सलमानच्या जवळच्या प्रशांत गुंजाळकरला रोहित गर्गकडून धमकीचा मेल आला होता. ईमेल प्रकरणात आयपीसीच्या कलम ५०६ (२), १२० (बी) आणि ३४ अंतर्गत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि रोहित गर्ग यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या नंतर सलमान खानच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली होती.
संबंधित बातम्या