दिल्लीतीलमुखर्जी नगर येथील ज्ञान बिल्डिंगमध्ये गुरुवार आग लागली. या इमारतीमध्ये अनेक कोचिंग सेंटर चालवले जातात. ज्यावेळी आग लागली त्यावेळी इमारतीमध्ये ३०० विद्यार्थी उपस्थित होते. आग लागल्यानंतर इमारतीमधून धूर निघू लागला. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ माजला. विद्यार्थ्यांनी जीव वाचवण्यासाठी रस्सीच्या मदतीने इमारतीवरून उड्या मारायला सुरूवात केली. यावेळी चार विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दिल्ली पोलिसांनी सांगितले की, ही आग ११.४५ ते ११.५० च्या सुमारास लागली. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील वीजेच्या मीटरला ही आग लागली होती. आग इतकी मोठी नव्हती, मात्र धूर निघू लागल्याने मुले घाबरली व ते इमारतीवरून रस्सीच्या मदतीने उतरू लागली. ही रस्सी इमारतीच्या खाली जमा झालेल्या लोकांनी वरती फेकली होती. त्यानंतर लोकांनी इमारतीच्या खाली गाद्या अंथरल्या होत्या. त्यावरच विद्यार्थ्यांनी इमारतीवरून उड्या मारल्या.
या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये पाहू शकता की, आग लागल्यानंतर कोचिंग सेंटरमध्ये कशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. विद्यार्थ्यांना आपला जीव वाचवण्यासाठी रस्सीच्या मदतीने उड्या माराव्या लागल्या.
आगीची सूचना मिळताच दिल्ली पोलिसांचे पथक व अग्निशामक दलाच्या ११ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी बचाव अभियान सुरू करण्यात आले. विद्यार्थ्यांना कोचिंगमधून बाहेर काढण्यासाठी अग्निशामक दलाने शिडीचा वापर केला. सांगितले जात आहे की, जेव्हा इमारतीला आग लागली त्यावेळी इमारतीत ३०० विद्यार्थी होते.