रेल्वे संबंधित अपघाताच्या बातम्यांनी अंगावर शहारे येऊ लागले आहेत. गेल्या महिन्यात ओडिशामधील बालासोरमध्ये झालेल्या कोरोमंडल एक्स्प्रेस अपघातानंतर ट्रेन संबंधित कोणत्याही अप्रिय घटनेचे नाव एकताच काळजात धस्स होते. शुक्रवारी हावडा-सिकंदराबाद फलकनुमा एक्सप्रेसला आग लागल्याची घटना घडली. ट्रेनच्या तीन कोच आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास तेलंगाणा राज्यातील मुम्मीपल्लीआणि पगिडीपल्ली दरम्यान ही घटना घडली. ट्रेनमधून धूर निघताच प्रवाशांना सुरक्षित खाली उतरवले गेले. थोडा जरी विलंब झाला असता तर मोठा अनर्थ झाला असता.
एएनआयच्या रिपोर्टनुसार या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. आगीचे कारण अजून समोर आलेले नसून सर्व प्रवाशी सुरक्षित आहेत. त्यांना दुसऱ्या रेल्वेने हैदराबादला आणले जाईल.
२ जून रोजी चेन्नईकडे जाणाऱ्या कोरोमंडल एक्सप्रेसला ओडिशामधील बालासोर येथे मोठा अपघात झाला होता. या भयानक दुर्घटनेनंतर एका महिन्यात रेल्वे संबंधित अनेक अपघातांच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आगच्या घटनेपूर्वीही अनेक रेल्वे गाड्यांमध्ये आगीच्या घटना घडल्या आहेत.
ओडिशा राज्यातील ब्रह्मपूरमध्ये सिकंदराबाद-आगरतळा एक्सप्रेसमध्ये आग लागली होती.उत्तर प्रदेशमधील कौशांबी जिल्ह्यातील भरवाड़ी स्टेशनजवळ सियालदह-अजमेर एक्सप्रेसच्या बोगींमधून धूर निघत असल्याचे दिसून आले होते.ओडिशा राज्यातील नौपारा जिल्ह्यात दुर्ग-पुरी एक्सप्रेसमध्येही आग लागली होती. ओडिशामधील बरगढ जिल्ह्यात एक मालगाड़ी रुळावरून घसरली होती. मध्य प्रदेशमधील जबलपूरमध्ये एलपीजी गॅसची वाहतूक करणाऱ्या दोन वॅगन दुर्घटनाग्रस्त झाल्या होत्या.