Mahakumbh 2025: कुंभमेळ्यात गुरुवारी दुपारी पुन्हा एकदा भीषण आग लागली. या आगीत डझनाहून अधिक तंबू जळून खाक झाल्याची माहिती समोर आली. छतनाग घाट, नागेश्वर घाट सेक्टर २२ जवळील टेंट सिटीमध्ये ही आग लागली. झुन्सी बाजूला छतनागजवळ जत्रेच्या काठावर हा घाट आहे. या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले असून अनेक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
महाकुंभाच्या सेक्टर २२ मध्ये चेंगराचेंगरीनंतर गुरुवारी अचानक आग लागली. भाविकांनी जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धाव घेतली. माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेले अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. महाकुंभचा सेक्टर २२ हा परिसर झुंसीच्या छतनाग घाट आणि नागेश्वर घाटाच्या दरम्यान आहे, जिथे ही घटना घडली. सुदैवाने, तंबूत कोणीही भाविक नव्हता. आगीत अनेक तंबू जळून खाक झाले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात अनेक तंबू जळताना दिसत आहेत.
यूपी अग्निशमन विभागाचे अधिकारी प्रमोद शर्मा यांनी सांगितले की, छतनाग घाट पोलिस स्टेशन परिसरात आज १५ तंबूंमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली. सडीएमच्या मते, ज्या तंबूत आग लागली, तो अनधिकृत तंबू होता. परिस्थिती नियंत्रणात असून आगीत कोणतीही जीवितहान न झाल्याचे माहिती आहे.
यापूर्वी २९ जानेवारी रोजी गोरखपूरमधील गीता प्रेसच्या कॅम्पला आग लागल्याची घटना घडली, ज्यात दीडशेहून अधिक कॉटेज जळून खाक झाल्या. शास्त्री पुलाजवळ सेक्टर १९ मध्ये गीता प्रेस कॅम्प उभारण्यात आला होता. त्यानंतर प्रशासनाने छोट्या सिलिंडरमधील गळतीमुळे आग लागल्याचे कारण दिले होते. मात्र, गीता प्रेसने बाहेरून लागलेल्या आगीचे कारण सांगितले होते.
गेल्या वेळी जेव्हा आग लागली होती तेव्हा राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रयागराजमध्ये होते. आग लागली तेव्हा मुख्य सचिव मनोज कुमार सिंह आणि डीजीपी प्रशांत कुमार महाकुंभ मेळा परिसरात होते. कालझालेल्या चेंगराचेंगरीच्या कारणांचा शोध घेण्यासाठी हे दोन्ही अधिकारी दाखल झाले आहेत. या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला होता. सुमारे ६० जण जखमी झाले आहेत. ३६ जणांवर वैद्यकीय महाविद्यालयातच उपचार सुरू आहेत.
संबंधित बातम्या