Anantapuram Viral Video: आंध्रप्रदेशातील अनंतपूर येथील पेट्रोल पंपाजवळ एका दुकानाबाहेर अचानक आग लागल्याने परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ माजली. ही इतक्या वेगाने पसरली की, काही सेकंदातच तिने आजूबाजुची अनेक दुकाने आणि वाहने जळून खाक झाली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून आग जवळच्या पेट्रोल पंपापर्यंत पोहोचली नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून एका व्यक्तीने विडी ओढल्यानंतर माचिसची जळती काडी रस्त्यावर फेकल्यानंतर हा प्रकार घडला.
आगीच्या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना धक्काच बसला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती दुचाकीवरून जवळच्या पेट्रोल पंपावरून प्लास्टिकच्या डब्यात पाच लिटर पेट्रोल घेऊन आला. तिथे त्याला त्याचा एक मित्र दिसला. त्यानंतर तो त्याच्याशी बोलताना दिसत आहे. मग त्याने विडी पेटवली आणि जळती माचिसची काडी रस्त्यावर फेकली. यामुळे मोठी आग लागली.
प्लास्टिकच्या डब्यातून गळती होऊन पेट्रोल रस्त्यावर पडल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, त्या व्यक्तीने त्याकडे लक्ष दिले नाही. आगीने त्यांची दुचाकी आणि आजूबाजूची अनेक वाहने आणि दुकाने जळून खाक झाली. संबंधित व्यक्तीला एतक्या मोठ्या प्रमाणात पेट्रोल कसे देण्यात आले, याचा तपास पोलीस करत आहेत. पेट्रोल पंपावर वाहनाव्यतिरिक्त कोणत्याही वस्तूमध्ये पेट्रोल देणे बंधनकारक आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आंध्र प्रदेशातील अच्युतापुरम येथील एका फार्मा युनिटला बुधवारी भीषण आग आणि स्फोट होऊन १७ जणांचा मृत्यू झाला. तर, ३३ जण जखमी झाले. ही घटना दुपारच्या वेळेस घडली, जेव्हा इतर कर्मचारी जेवायला गेले होते. यामुळे मोठी जीवितहानी टळली. दुपारच्या जेवणाच्या वेळेमुळे अपघात झाला तेव्हा कारखान्यात कमी कामगार होते.
सायंटिया अॅडव्हान्स्ड सायन्स प्रायव्हेट लिमिटेड मध्ये दुपारी सव्वा दोन वाजताच्या सुमारास ही आग लागली. अनकापल्लीच्या जिल्हाधिकारी विजया कृष्णन यांनी सांगितले की, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा संशय आहे.आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू गुरुवारी घटनास्थळाला भेट देणार असून व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन देत या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.