तेलंगण विधानसभेत १५ डॉक्टरांची ‘एन्ट्री’; प्रत्येक १० पैकी एक आमदार डॉक्टर!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  तेलंगण विधानसभेत १५ डॉक्टरांची ‘एन्ट्री’; प्रत्येक १० पैकी एक आमदार डॉक्टर!

तेलंगण विधानसभेत १५ डॉक्टरांची ‘एन्ट्री’; प्रत्येक १० पैकी एक आमदार डॉक्टर!

Dec 05, 2023 09:28 PM IST

Fifteen doctors elected in Telangana: रुग्णसेवेच्या माध्यमातून जनसेवेच्या प्रांतात उडी घेतलेले तब्बल १५ डॉक्टर तेलंगण विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले आहेत.

तेलंगण विधानसभेत १५ डॉक्टरांची ‘एन्ट्री’
तेलंगण विधानसभेत १५ डॉक्टरांची ‘एन्ट्री’

रुग्णसेवेच्या माध्यमातून जनसेवेच्या प्रांतात उडी घेतलेले तब्बल १५ डॉक्टर तेलंगण विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले आहेत. अशाप्रकारे एकूण ११९ आमदारसंख्या असलेल्या तेलंगण विधानसभेत प्रत्येक १० आमदारांपैकी एक आमदार हा व्यवसायाने डॉक्टर असल्याचे दिसून आले आहे. विजयी झालेल्या एकूण डॉक्टर आमदारांपैकी काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक ११ आमदार असून भारत राष्ट्र समितीचे तीन तर भाजपचा एक आमदार हा व्यवसायाने डॉक्टर आहे. विशेष म्हणजे सर्व आमदार हे राज्याच्या ग्रामीण भागात असलेल्या मतदारसंघांमधून विधानसभेवर निवडून आले आहेत. या १५ डॉक्टरांपैकी तीन आमदार हे अस्थिरोगतज्ञ आहेत. अस्थिरोग तज्ञांमध्ये भाजप आमदार डॉ. पलवी हरिश बाबू (सिरपूर मतदारसंघ), बीआरएसचे डॉ. तेल्लम वेंकट राव (भद्राचलम मतदारसंघ) आणि डॉ. भूपती रेड्डी (निझामाबाद) यांचा समावेश आहे.

विजयी झालेल्या आमदारांमध्ये सहा जनरल सर्जनचा समावेश आहे. यात कॉंग्रेस पक्षाचे आमदार डॉ. राम चंद्र नाईक (दोरनाकल), डॉ. वामशी कृष्णा (अचमपेट), डॉ. मुरली नाईक (महबूबाबाद), डॉ के. सत्यनारायण (माणकोंडुरू), डॉ. मयनामपल्ली रोहित (मेडक) आणि डॉ. विवेक व्यंकटस्वामी (चेन्नूर) यांचा समावेश आहे. डॉ. रोहित आणि डॉ. व्यंकटस्वामी हे पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहे.

विजयी झालेल्यांमध्ये जनरल फिजिशियन डॉ. पर्णिका रेड्डी (काँग्रेस, नारायणपेठ) तर बालरोगतज्ञ डॉ. पी संजीव रेड्डी (काँग्रेस, नारायणखेड) यांचा समावेश आहे. न्यूरोसर्जन डॉ कलवकुंतला संजय हे कोरुटला विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. जगतियाल मतदारसंघातून विजयी झालेले बीआरएस पक्षाचे डॉ. एम. संजय कुमार हे व्यवसायाने नेत्ररोगतज्ज्ञ आहेत.

सत्तुपल्ली मतदारसंघातून विजयी झालेले कॉंग्रेसचे एम. रागामयी हे पल्मोनोलॉजिस्ट असून नगरकुर्नूल मतदारसंघातून विजयी झालेले कॉंग्रेस आमदार डॉ. कुचुकुल्ला राजेश रेड्डी हे दंत शल्यचिकित्सक आहेत.

तेलंगणमध्ये कॉंग्रेस पक्षाला बहुमत मिळाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करणार आहे. कॉंग्रेसकडे ११ डॉक्टर आमदार असताना आता सरकारमध्ये आरोग्य खात्याची जबाबदारी कुणाकडे दिली जाते, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर