पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे-मागे जाणाऱ्या महिला एसपीजी कमांडोचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोवरून वेगवेगळ्या कमेंट केल्या जात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एसपीजीमध्य़े पहिल्यांदाच महिला आलेल्या नाहीत. एसपीजीमध्ये महिलांना आधीपासून सुरक्षेसाठी तैनात केले जात आहे. सुरुवातीच्या काळात एसपीजीमध्ये महिलांना एडवान्स्ड डेप्लॉयमेंटसाठी ठेवले जात होते. महिला एसपीजीचा जो फोटो व्हायरल होत आहे, त्याबाबत माहिती मिळाली आहे की, हा फोटो संसदेच्या आतील आहे. संसदेत एसपीजीच्या महिलांना तैनात केले जाते.
व्हायरल झालेला फोटो २७नोव्हेंबर रोजीचा आहे. या फोटोमध्ये पंतप्रधान मोदी एका व्यक्तीबरोबर चालताना दिसत असून त्यांच्या मागे एक तरुणी चालताना दिसत आहे. सुटाबुटात असलेली ही तरुणी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या तरुणीचं नेमकं नाव काय आहे हे समजू शकलेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार,ही तरुणी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपमधील (एसपीजी) कमांडो आहे. अनेकांनी मोदींचा हा फोटो व्हायरल केला असून पहिल्यांदाच एसपीजीमध्ये महिला कमांडो तैनात करण्यात आल्याचा दावा केला आहे.
सध्या एसपीजीमध्ये १०० महिला कमांडो आहेत. यापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या सुरक्षेसाठी महिला एसपीजी कमांडो तैनात करण्यात आल्या होत्या. मात्र पंतप्रधानाच्या सुरक्षेत महिला कमांडो तैनात करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं मोदी समर्थक सांगत आहेत. याच कारणामुळे मोदींचा हा फोटो व्हायरल होत आहे.पहिल्यांदाच महिला एसपीजी कमांडो तैनात करण्यात आल्याचा दावा केला जात असला तरी एसपीजीमध्ये २०१३ पासून या विशेष दलातील महिलांना पंतप्रधानांच्या सुरक्षेमध्ये सामावून घेण्यात आलं आहे. २०१३ मध्ये पहिल्यांदा तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांची पत्नी गुरशरण कौर यांच्या सुरक्षेमध्ये एसपीजी महिला तैनात असल्याचं दिसून आलं होतं. हा फोटोही आता व्हायरल होत असून मोदी हे पहिले पंतप्रधान नाहीत, ज्यांच्या सुरक्षेत महिला एसपीजी तैनात करण्यात आले आहेत, हे सांगण्यासाठी व्हायरल होताना दिसत आहे.
विशेष सुरक्षा समूह (SPG) ची स्थापना १९८५ मध्ये पंतप्रधान, माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटूंबीयांना सुरक्षा पुरवण्याच्या उद्देश्याने करण्यात आली होती.SPG अधिकाऱ्यांमध्ये उच्च नेतृत्व गुण, व्यावसायिकता, सुरक्षेचे ज्ञान असते.SPG ने ना केवळ आपल्या कामात तरIB आणि राज्य/केंद्र शासित प्रदेशातील पोलीस दलांना सहकार्य केले आहे.